- धंदा चालू ठेवायचा तर खंडणी देण्याची मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
काळेवाडी (दि. २० जुलै २०२६) :- काळेवाडी परिसरातील एका हॉटेल मालकाकडे दरमहा १० हजार रुपयांच्या हप्त्याची मागणी करत मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी काळेवाडी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
या प्रकरणी महेश पोपट नढे (वय २९, रा. नढेनगर, काळेवाडी) यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रतिक ऊर्फ बब्या गोरख भराटे (वय २३, रा. मिलिटरी कॅम्प, दिघी) आणि रोहित मानसिंग राठोड (वय २०, रा. नढेनगर, काळेवाडी) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (१९ जुलै) पहाटे सुमारे १.०८ वाजता महेश रेस्टॉरंट अँड बारसमोर ही घटना घडली. आरोपींनी हॉटेलमधून तंदूर घेतल्यानंतर त्याचे पैसे मॅनेजर अजित पवार यांनी मागितल्याचा राग मनात धरून शिवीगाळ केली. त्यानंतर “आम्ही जेलमधून सुटून आलो आहोत. हॉटेल चालवायचे असेल तर दरमहा १० हजार रुपये हप्ता द्यावा आणि आम्ही आलो की दारू व जेवण मोफत द्यावे, अन्यथा हॉटेल चालू देणार नाही,” अशी धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
फिर्यादीने हप्ता देण्यास नकार दिल्यानंतर दोन्ही आरोपींनी हॉटेलमधील मॅनेजर, कामगार आणि फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच प्रतिक भराटे याने सिमेंटचा गड्डा फिर्यादीच्या डाव्या हातावर मारून जखमी केले, तर रोहित राठोड याने हप्ता न दिल्यास जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास काळेवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

















