- भक्ती-शक्ती उद्यानासमोर पीएमपीएमएल बसथांबा हलविण्याची सचिन काळभोरांची मागणी…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २० जुलै २०२६) :- निगडी ते पिंपरी मेट्रो रेल्वेचे काम सुरू असल्याने मुंबई-पुणे महामार्गावरील निगडी येथील मधुकर पवळे उड्डाणपुलाखाली वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. रस्त्याच्या कडेला मेट्रो प्रकल्पासाठी लोखंडी पत्रे उभारण्यात आल्याने रस्ता अरुंद झाला असून मोठी वाहने, पीएमपीएमएल बस आणि ट्रॅव्हल्स बसमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याचा दावा भाजप कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी केला आहे.
या पार्श्वभूमीवर सध्या असलेला निगडी पीएमपीएमएल बसथांबा तात्पुरता भक्ती-शक्ती उद्यानासमोर स्थलांतरित करावा, अशी मागणी काळभोर यांनी केली आहे. यामुळे वाहतूक सुरळीत होऊन नागरिकांचा वेळ वाचेल तसेच अपघाताचा धोका कमी होईल, असे त्यांनी म्हटले आहे.
वाहतूक कोंडीमुळे शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच इतर वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, मेट्रो प्रकल्प अधिकारी श्रावण हर्डीकर आणि वाहतूक पोलीस उपायुक्त देशमुख यांनी संयुक्त पाहणी करून तातडीने योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, या संदर्भात पिंपरी-चिंचवड महापालिका, पीएमपीएमएल प्रशासन, पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे तसेच मेट्रो प्रकल्प अधिकाऱ्यांना ई-मेलद्वारे तक्रार पाठविण्यात आल्याची माहिती सचिन काळभोर यांनी दिली आहे. प्रशासनाने लवकर निर्णय घेऊन वाहतूक कोंडी व संभाव्य अपघात टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

















