- पुन्हा कचरा डेपो सुरू करण्याची प्रशासनाची तयारी?..
- सभागृहात “एकही कचऱ्याची गाडी येऊ देणार नाही” असा इशारा देणाऱ्या नगरसेवकांची भूमिका काय?…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २१ जुलै २०२६) :- मोशी कचरा डेपोतील भीषण दुर्घटनेत नऊ कर्मचाऱ्यांचा बळी गेल्यानंतर संतप्त झालेल्या नागरिकांच्या भावना आणि महापालिकेतील सत्ताधारी नगरसेवकांच्या इशाऱ्यांनाही प्रशासनाने फारसे गांभीर्याने घेतले नसल्याचे चित्र समोर येत आहे. दुर्घटनेनंतर काही दिवस कचरा टाकणे बंद ठेवण्यात आले असले, तरी आता पुन्हा पूर्वीप्रमाणे मोशी डेपोत कचरा साठविण्याची तयारी सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
बुधवारी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत भाजपच्या नगरसेवकांनी मोशी कचरा डेपोचा मुद्दा आक्रमकपणे उपस्थित केला. “आमच्या मोशी गावाने संपूर्ण महापालिकेचा ठेका घेतला आहे का? आमच्या गावाला श्रद्धांजली वाहण्याची वेळ आली आहे. आता मोशीत एकही कचऱ्याची गाडी येऊ देणार नाही,” असा संतप्त इशारा नगरसेवकांनी दिला होता. मात्र, या भूमिकेला छेद देणारी प्रशासकीय हालचाल सुरू असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
डेपोतील उपलब्ध जागा संपल्याने शेजारील सुमारे १६ एकर जागा ताब्यात घेऊन तेथे नव्याने कचरा साठविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. खाणीत साचलेले घाण पाणी काढणे, सपाटीकरण करणे, लिचेटसाठी भूमिगत वाहिन्या उभारणे, त्यावर प्लास्टिक, माती आणि खडीचे स्तर तयार करणे अशी प्रक्रिया राबवून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी घेतल्यानंतर पुन्हा कचरा संकलन सुरू करण्याची तयारी प्रशासनाकडून सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
मोशी डेपोमध्ये १९९१ पासून ८१ एकर जागेत संपूर्ण शहराचा कचरा टाकला जात असून, दररोज सुमारे १,४४० टन कचरा येथे जमा होतो. वेस्ट-टू-एनर्जी, बायो-सीएनजी, प्लास्टिकपासून इंधन, ओल्या कचऱ्यापासून खत आणि बांधकाम राडारोड्यापासून विविध उत्पादने तयार करण्याचे प्रकल्प सुरू असले, तरी कचऱ्याचा वाढता भार कमी करण्यात ते अपुरे ठरत असल्याची टीका होत आहे. अशा परिस्थितीत प्रशासन पुन्हा मोशीवरच कचऱ्याचा भार टाकणार का? आणि सभागृहात आक्रमक भूमिका घेणारे नगरसेवक आता प्रत्यक्षात बघ्याची भूमिका घेतात काय? याकडे मोशीकरांसह संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
मोशी कचरा डेपो येथे वाहनांची ये-जा करण्यासाठी रस्ता मोकळा करण्याची कार्यवाही सुरू आहे. कचऱ्याचे डोंगर खाली कोसळणार नाहीत, याची खरबदारी घेऊन कचरा हटवला जात आहे. काम पूर्ण झाल्यानंतर पूर्वीप्रमाणे डेपोत कचरा टाकण्याची कार्यवाही सुरू केले जाईल.
– प्रमोद ओंभासे (मुख्य अभियंता मनपा)…

















