न्युज पीसीएमसी नेटवर्क
मोशी (दि. २१ जुलै २०२६) :- मोशी प्राधिकरणातील स्पाईन रोड परिसरात कारचालकाला जाब विचारल्याच्या किरकोळ कारणावरून व्यावसायिकावर लाकडी दांडक्याने हल्ला करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कुणाल भास्कर तोडकर (वय ४३, रा. कल्चर क्रिस्ट सोसायटी, मोशी) हे १९ जुलै रोजी रात्री साडेआठच्या सुमारास त्यांचा १४ वर्षीय मुलगा देवांश याच्यासह पायी फिरत होते. त्यावेळी वाईन शॉपीसमोर उभी असलेल्या एमएच-१४ एफएम-८४४४ क्रमांकाच्या पांढऱ्या रंगाच्या कारचालकाने कोणताही इशारा न देता अचानक कार त्यांच्या अगदी जवळून वळवली. याबाबत तोडकर यांनी हातवारे करून जाब विचारला.
याचा राग मनात धरून कारचालकाने पुढे कल्चर क्रिस्ट सोसायटीच्या प्रवेशद्वाराजवळ कार थांबवली. त्यानंतर कारमधील आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ केली. कारच्या मागील सीटवर बसलेल्या एका आरोपीने कारमधून लाकडी दांडका काढून तोडकर यांच्यावर हल्ला केला. या मारहाणीत त्यांच्या उजव्या हाताच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झाले. तसेच अन्य दोन आरोपींनीही शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. हल्ल्यानंतर तिन्ही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
या प्रकरणी राजू सुभाष येदे, गोविंद कांबळे आणि गौरव शर्मा (सर्व रा. मोशी, वय अंदाजे ३० ते ३५ वर्षे) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ११५(२), ११८(१), ११८(२), ३५२ आणि ३(५) अन्वये एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनेर करीत आहेत.


















