न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २१ जुलै २०२६) :- सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत पिंपळे गुरव येथील एका निवृत्त व्यक्तीकडून तब्बल ९ लाख रुपये उकळल्याप्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मारुती मुकींदा शिकरे (वय ६५, सेवानिवृत्त, रा. कृष्णकली, जगताप इस्टेट, पिंपळे गुरव) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. या प्रकरणी संजय श्रीरंग सोनोने (रा. पातूर, जि. अकोला) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, आरोपीने २०२४ मध्ये शिकरे यांच्या जावयाला सरकारी नोकरी लावून देण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी विविध कारणे सांगून टप्प्याटप्प्याने एकूण ९ लाख रुपये घेतले. मात्र, प्रत्यक्षात कोणतीही सरकारी नोकरी मिळवून दिली नाही. तसेच वारंवार मागणी करूनही घेतलेली रक्कम परत केली नाही.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शिकरे यांनी सांगवी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३१६(२) आणि ३१८(४) अन्वये विश्वासघात, फसवणूक आणि अपहाराचा गुन्हा नोंदविला आहे.
सरकारी नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली आर्थिक व्यवहार करताना नागरिकांनी अधिकृत प्रक्रिया आणि कागदपत्रांची खातरजमा करावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत.

















