- न्यायाच्या मागणीसाठी सर्वपक्षियांसह नागरिकांचा भव्य मोर्चा…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
ताथवडे (दि. ३० जुलै २०२६) :- ताथवडे येथे दोन अल्पवयीन मुलींवरील कथित लैंगिक अत्याचाराच्या घटनेविरोधात बुधवारी सायंकाळी सर्वपक्षीय एकत्र येत निषेध मोर्चा काढला. पीडित मुलींना तातडीने न्याय मिळावा आणि आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागण्यांसाठी विविध सामाजिक, धार्मिक, राजकीय संघटना तसेच सर्वपक्षीय व सर्वधर्मीय नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
नृसिंह चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. हातात निषेधाचे फलक घेऊन सहभागी नागरिकांनी घोषणाबाजी करत ताथवडे गावठाण मार्गे डांगे चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत रॅली काढली. तेथे झालेल्या सभेत उपस्थितांनी संताप व्यक्त करत दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी एकमुखी मागणी केली.
यानंतर पोलिस उपायुक्त प्रदीप जाधव यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. आरोपीविरुद्ध कठोर कलमांखाली कारवाई करावी, खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावा आणि पीडित मुलींना लवकरात लवकर न्याय मिळावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
या मोर्चात आमदार शंकर जगताप, स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे, नगरसेवक राहुल कलाटे, कुणाल वाव्हळकर, नगरसेविका रेश्मा भुजबळ, श्रुती वाकडकर, स्नेहा कलाटे, राम वाकडकर, चेतन भुजबळ, सुप्रिया पवार, शिवसेना शहराध्यक्ष चेतन पवार, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे शहराध्यक्ष श्रीकांत नवले, अजित पवार, साकी गायकवाड, रवी भिलारे, सिद्धेश सोनकवडे, विकास जाधव, योगेश पवार, रितू कांबळे यांच्यासह विविध सामाजिक, धार्मिक व राजकीय संघटनांचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.


















