- तीन दिवस कान्हादेशी संस्कृती, परंपरा आणि सामाजिक एकतेचा उत्सव…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २६ ऑगस्ट २०२६) :- कान्हादेशची आराध्य देवी आई कानबाई मातेच्या भक्ती, श्रद्धा आणि समृद्ध परंपरेचा जागर घडविणारा सार्वजनिक कानबाई माता उत्सव २०२६ मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. कानबाई माता चॅरिटेबल ट्रस्ट व समस्त कान्हादेश समाजबांधवांच्या वतीने २२, २३ आणि २४ ऑगस्ट रोजी हा तीन दिवसीय उत्सव आयोजित करण्यात आला होता.
वाल्हेकरवाडी पोलीस चौकीसमोरील चिंतामणी चौक येथील पीएमआरडीए मैदानावर झालेल्या या उत्सवाला पिंपरी-चिंचवडसह पुणे परिसरातील कान्हादेश समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
उत्सवाची सुरुवात २२ ऑगस्ट रोजी पारंपरिक पूजन आणि धार्मिक विधींनी झाली. यानिमित्त सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. रवीकिरण महाराज यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले. त्यांच्या ओघवत्या वाणीतून भक्ती, संस्कार आणि सामाजिक एकतेचा संदेश देण्यात आला.
दुसऱ्या दिवशी, २३ ऑगस्ट रोजी शिवनगरी गणपती मंदिर येथून आई कानबाई मातेची भव्य आगमन मिरवणूक काढण्यात आली. पारंपरिक वेशभूषेतील महिला, कलशधारी भगिनी, समाजबांधव तसेच युवकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे मिरवणुकीला विशेष रंगत आली. ढोल-ताशे आणि बँडच्या गजरात मिरवणूक उत्सवस्थळी पोहोचल्यानंतर आई कानबाई मातेची विधिवत स्थापना व पूजन करण्यात आले.
तीनही दिवस धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसह भाविकांसाठी दर्शन व महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. कानबाई मातेच्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. या उत्सवाच्या माध्यमातून कान्हादेशची संस्कृती, परंपरा आणि सामाजिक एकतेचे दर्शन घडले.
२४ ऑगस्ट रोजी आई कानबाई मातेची भव्य विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. पारंपरिक वाद्यांच्या गजरात भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले. चिंचवडे लॉन्स, रिव्हर व्ह्यू हॉटेल येथे विसर्जन मिरवणुकीचा समारोप होऊन तीन दिवसीय उत्सवाची भावपूर्ण सांगता झाली.
उत्सवाला नगरसेवक नाना काटे, भाऊसाहेब भोईर, शत्रुघ्न काटे, राहुल कलाटे, शेखर चिंचवडे, आशा सूर्यवंशी, विकास साने, मोरेश्वर भोंडवे, राम वाकडकर, धर्मपाल तंतरपाळे, सचिन सानप, बापूसाहेब कातळे, माऊली सूर्यवंशी, मोरेश्वर शेडगे, उमाकांत सोनवणे, निलेश तरस, संतोष सौंदनकर, रिटा सानप, पंकज भालेकर, प्रवीण भालेकर, मयूर जयस्वाल आणि राजेंद्र चिंचवडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी गुलाबराव सैंदाणे, दादाजी पगार, डॉ. विजयकुमार पाटील, डॉ. सुरेश सूर्यवंशी, रविंद्र कुवर, राजेंद्र निकम, गुलाब पाटील यांच्यासह अनेक समाजबांधव, महिला, युवक, कार्यकर्ते आणि स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.
“आई कानबाई मातेच्या आशीर्वादाने २०२६ चा तीन दिवसीय उत्सव मोठ्या उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाला. कान्हादेशी संस्कृती, परंपरा आणि समाजाची एकजूट अशीच कायम राहो, हीच आई कानबाई मातेच्या चरणी प्रार्थना,” अशी भावना आयोजकांनी व्यक्त केली.


















