- गणेशोत्सव, सायकल ट्रॅक, प्लास्टिक बंदी आणि पालिकेच्या मालमत्तांचा आढावा घेण्याच्या केल्या सूचना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २६ ऑगस्ट २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीची साप्ताहिक बैठक मंगळवारी (दि. २५) सभापती अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत शहरातील संगणक प्रणालीची सुरक्षितता, महिला सक्षमीकरण, मत्स्यव्यवसाय, रस्ते विकास, वैद्यकीय सुविधा, क्षेत्रीय कार्यालयांची पुनर्रचना तसेच विद्यार्थ्यांसाठीच्या शैक्षणिक उपक्रमांसह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत सभापती अभिषेक बारणे यांनी शहराशी संबंधित महत्त्वाच्या धोरणात्मक विषयांवर तातडीने निर्णय घेण्याचे संकेत दिले. पार्किंग धोरण, मेट्रो आणि ईआरटीएससारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांशी संबंधित प्रस्तावांना प्राधान्याने मंजुरी देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरही प्रशासनाला विविध सूचना देण्यात आल्या आहेत. गणेशोत्सव काळात फिरता रथ उपलब्ध करून देणे, निर्माल्य संकलनाची प्रभावी व्यवस्था करणे आणि स्वच्छतेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यावर भर देण्यात येणार आहे.
शहरातील सायकल ट्रॅक नागरिकांसाठी मोकळे आणि सुरक्षित राहावेत, यासाठी सर्व सायकल ट्रॅकची पाहणी करून त्यावरील अतिक्रमणे हटविण्याच्या सूचना शहरी दळणवळण विभागाला देण्यात आल्या आहेत. सायकल ट्रॅक अतिक्रमणमुक्त झाल्यास नागरिकांना पर्यावरणपूरक वाहतुकीचा पर्याय अधिक प्रभावीपणे उपलब्ध होईल, असे बारणे यांनी सांगितले.
तसेच महापालिकेच्या ताब्यातील मोकळ्या इमारती आणि भूखंडांची सविस्तर माहिती संकलित करण्याच्या सूचनाही प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. शहरातील जलतरण तलाव सुरू करण्याबाबतही कार्यवाही करण्यास सांगण्यात आले आहे.
दरम्यान, बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक पिशव्यांवर कारवाई करण्याची मागणी स्थायी समिती सदस्य बाबासाहेब त्रिभुवन यांनी केली बैठकीत केली होती. त्यानुसार प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी नागरिकांमध्ये कापडी पिशव्यांच्या वापराबाबत जनजागृती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असेही बारणे म्हणाले.


















