- कॅनबे चौक ते ज्योतिबा मंदिर रस्त्याने बाधित होणाऱ्या मिळकतींची 27 ऑगस्टला मोजणी..
- चौकात महापालिकेची फलकबाजी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
तळवडे, (दि. २६ ऑगस्ट २०२६) :- तळवडे परिसरातील प्रस्तावित १८ मीटर रस्त्याच्या कामाला गती देण्याच्या दृष्टीने पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून संयुक्त मोजणीची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. याबाबतचे फलक तळवडे परिसरात लावण्यात आले असून, संबंधित मिळकतधारकांचे लक्ष या प्रक्रियेकडे वेधले गेले आहे.
महापालिकेने लावलेल्या फलकानुसार, मौजे तळवडे, ता. हवेली, जि. पुणे येथील विविध गट क्रमांकांमधील कॅनबे चौक ते ज्योतिबा मंदिरापर्यंतच्या १८ मीटर रस्त्यामुळे बाधित होणाऱ्या सर्व मिळकतींची संयुक्त मोजणी करण्यात येणार आहे.
ही मोजणी भूमी अभिलेख विभाग, हवेली यांच्यामार्फत 27 ऑगस्ट रोजी करण्यात येणार असल्याचे फलकावर नमूद करण्यात आले आहे. संबंधित नागरिकांनी या मोजणीची नोंद घ्यावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
या प्रक्रियेमुळे रस्त्याच्या प्रस्तावित रुंदीमध्ये येणाऱ्या मिळकतींची प्रत्यक्ष हद्द निश्चित होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे तळवडे परिसरातील संबंधित मिळकतधारकांचे या मोजणीकडे विशेष लक्ष लागले आहे.
महापालिकेच्या फलकावर संयुक्त मोजणी करणारे कर्मचारी म्हणून कालिदास सर्वगोड यांचा मोबाईल क्रमांक तसेच महापालिका सर्व्हेअर घनश्याम गवळी यांचा संपर्क क्रमांक देण्यात आला आहे.
तळवडे परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी विविध रस्ते विकसित करण्याची मागणी यापूर्वीही करण्यात आली आहे. तळवडेतील १८ मीटर रस्त्यासह इतर रस्ते विकासाच्या प्रस्तावांचा उल्लेख यापूर्वीच्या वृत्तांतही झाला आहे.
दरम्यान, संयुक्त मोजणीची प्रक्रिया सुरू झाल्याने या रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात कधी सुरुवात होते, याकडे तळवडेकरांचे लक्ष लागले आहे.

















