- दैनिक पास आता ७० रुपयांऐवजी केवळ ३५ रुपये…
- जेष्ठांसाठी सुरक्षित, सुलभ आणि परवडणारी वाहतूक उपलब्ध – स्थायी सभापती अभिषेक बारणे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २६ ऑगस्ट २०२६) :- पिंपरी-चिंचवड आणि पुणे महापालिका हद्दीतील ६० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना पीएमपीएमएल बस प्रवासात ५० टक्के सवलत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. पीएमपीएमएलच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, २४ ऑगस्ट २०२६ पासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. या निर्णयामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी पीएमपीएमएलचा बस प्रवास अधिक सुलभ आणि परवडणारा होणार आहे. विशेषतः दररोज बसने प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना या सवलतीचा मोठा फायदा मिळणार आहे.
या निर्णयानुसार ज्येष्ठ नागरिकांसाठीचा दैनिक पास ७० रुपयांवरून थेट ३५ रुपये करण्यात आला आहे. त्यामुळे नियमित प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या प्रवास खर्चात मोठी बचत होणार आहे. वाढत्या महागाईच्या काळात ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक दिलासा देणारा हा निर्णय मानला जात आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी घेतलेल्या या निर्णयामुळे पीएमपीएमएलच्या बससेवेचा वापर वाढण्यासही मदत होण्याची शक्यता आहे. तसेच खासगी वाहनांवरील अवलंबित्व कमी करून सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
जेष्ठांसाठी सुरक्षित, सुलभ आणि परवडणारी वाहतूक उपलब्ध – अभिषेक बारणे…
स्थायी समितीचे सभापती अभिषेक गोविंद बारणे म्हणाले, “ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या शहराच्या विकासात आणि सामाजिक जडणघडणीत मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या दैनंदिन प्रवासात आर्थिक अडचण येऊ नये, हा या निर्णयामागचा प्रमुख उद्देश आहे. पीएमपीएमएलच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षित, सुलभ आणि परवडणारी सार्वजनिक वाहतूक उपलब्ध करून देण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा आहे. दैनिक पास ७० रुपयांवरून ३५ रुपये झाल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. भविष्यातही नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले जातील.”

















