न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २६ ऑगस्ट २०२६) :- थेरगाव आणि चिंचवड परिसरातील दाट लोकवस्तीतून प्रस्तावित एचसीएमटीआर अर्थात रिंग रोड तसेच प्रशस्त रस्त्यांच्या आरक्षणाला नागरिकांनी तीव्र विरोध केला आहे. प्रस्तावित आरक्षणांमुळे अनेक घरे व मालमत्ता बाधित होणार असल्याने ही आरक्षणे रद्द करावीत, अशी आग्रही मागणी नागरिकांनी सुधारित प्रारूप विकास आराखड्याच्या सुनावणीवेळी केली.
महापालिकेच्या सुधारित प्रारूप विकास योजना आराखड्यावर दाखल झालेल्या तब्बल ५६ हजार ७७१ हरकतींवर आकुर्डीतील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात सुनावणी सुरू आहे. थेरगाव परिसरातील आरक्षणांबाबत झालेल्या सुनावणीस नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
घर बचाव संघर्ष समितीच्या प्रतिनिधींनी रिंग रोडच्या प्रस्तावास तीव्र आक्षेप नोंदविला. विकसित आणि दाट लोकवस्तीच्या भागातून रिंग रोड नेल्यास नागरिकांचे मोठे नुकसान होईल, असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. विजयकुमार पाटील, प्रीतम पवार, नारायण चिघळीकर, धनाजी येळकर पाटील यांच्यासह अनेकांनी आपली बाजू मांडली.
स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे, सदस्य संदीप कस्पटे व सारिका गायकवाड यांनी नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले. डीपी मंजूर करताना सर्वसामान्यांवर अन्याय होऊ देणार नाही, चुकीचे आरक्षण लादले जाणार नाही, असे आश्वासन बारणे यांनी दिले.


















