- शिवसेना (उबाठा) नेते आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल…
- नागरिकांना सोयी-सुविधा तातडीने पुरवण्याची मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०७ सप्टेंबर २०२६) :- हिंजवडी मेट्रो प्रकल्पाचे श्रेय घेण्यासाठी आणि उद्घाटनाच्या राजकारणामुळे सेवा सुरू करण्यास विलंब केला जात आहे. इच्छाशक्ती असेल तर प्रलंबित प्रश्न आठवडाभरात सोडवता येऊ शकतात. उद्घाटनाची वाट न पाहता प्रवाशांसाठी मेट्रो सेवा तातडीने सुरु करा, अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली.
हिंजवडी परिसरातील वाढती वाहतूक कोंडी आणि मूलभूत नागरी सुविधांच्या अभावाविरोधात काढण्यात आलेल्या मोर्चाला आयटी क्षेत्रातील कर्मचारी, स्थानिक नागरिक तसेच सुमारे ५०० महिलांनी मोठा प्रतिसाद दिला. नागरिकांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याचे आश्वासन यापूर्वी दिल्याप्रमाणे आदित्य ठाकरे यांनी या मोर्चात सहभागी होत आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. या आंदोलनात शिवसेना सचिव सूरज चव्हाण, पुणे जिल्हा प्रभारी सचिन पडवळ, पुणे जिल्हाध्यक्ष प्रकाश भेगडे, रामदास धनवटे, पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष चेतन पवार, संयुक्त जिल्हा प्रभारी गजानन थरकुडे, संजय मोरे यांच्यासह पक्षाचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी होते.
आदित्य ठाकरे म्हणाले की, खड्ड्यांमुळे होणारे अपघात व मृत्यू, प्रचंड वाहतूक कोंडी आणि मूलभूत पायाभूत सुविधांचा अभाव यामुळे हिंजवडी, मान आणि मारुंजी परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. नागरिकांकडून कर घेतला जातो, त्यामुळे त्यांना चांगले रस्ते आणि मूलभूत नागरी सुविधा मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. तसेच, सरकारने राजकीय संघटना किंवा कार्यकर्त्यांच्या भूमिकेपेक्षा सर्वसामान्य पुणेकर आणि स्थानिक नागरिकांना विश्वासात घ्यावे. गणेशोत्सव जवळ येत असताना विविध मतदारसंघांमध्ये डीजेबाबत वेगवेगळे नियम लागू असल्याने संभ्रम आणि नाराजी निर्माण झाली आहे. त्यामुळे गणेशोत्सवातील डीजेच्या वापराबाबत सरकारने आयोजक आणि स्थानिक नागरिकांना मान्य होईल, असा स्पष्ट व एकसमान निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
“पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना ज्या मूलभूत नागरी सुविधा दिल्या जातात, त्याच सुविधा हिंजवडी आणि परिसरातील रहिवाशांना का दिल्या जात नाहीत? हिंजवडीचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, सरकार केवळ वेळकाढूपणा करत आहे. मेट्रोचे काम पूर्ण झालेले असतानाही ती अद्याप सुरू करण्यात आलेली नाही. खड्डेमुक्त रस्ते, नालेसफाई, पाणीपुरवठा आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही स्थानिक प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांची जबाबदारी आहे. या प्रश्नांसाठी नागरिकांनी अनेकदा आंदोलने करूनही सरकारला त्याची कोणतीही गांभीर्याने दखल घ्यावीशी वाटत नाही. हिंजवडीतील नागरिकांनाही दर्जेदार रस्ते, सुरळीत वाहतूक, मेट्रो आणि मूलभूत नागरी सुविधा मिळण्याचा समान अधिकार आहे. सरकारने आता आश्वासनांपलीकडे जाऊन ठोस आणि कालबद्ध कृती करावी.”
— चेतन पवार, शहरप्रमुख, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), पिंपरी-चिंचवड शहर.


















