- कुरुळीतील गट नं. २३३/१ प्रकरणात पीएमआरडीए आयुक्तांना निवेदन..
- प्लॉटिंग माफियांच्या मुसक्या आवळण्याची मागणी?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ सप्टेंबर २०२६) :- पिंपरी-चिंचवड शहराचा अनधिकृत बांधकामांमुळे झालेला बकालपणा आणि त्यातून निर्माण झालेल्या गंभीर समस्या पाहूनही पीएमआरडीए प्रशासन त्यातून बोध घेताना दिसत नाही. पीएमआरडीएच्या हद्दीत दिवसेंदिवस वाढत असलेल्या अनधिकृत बांधकामांकडे प्रशासनाकडून जाणूनबुजून दुर्लक्ष होत आहे. प्रशासनाने अनधिकृत बांधकामांवर वेळीच कठोर कारवाई केली नाही, तर भविष्यात कुदळवाडीप्रमाणे गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. मग त्याला जबाबदार कोणाला ठरवायचे? असा सवाल पुणे शहर भाजप कामगार आघाडीचे शहराध्यक्ष ओंकार कदम यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान त्यांनी खेड तालुक्यातील कुरुळी येथील गट नं. २३३/१ मध्ये आवश्यक पूर्वपरवानग्या, ले-आऊट मंजुरी अथवा बांधकाम परवाना न घेता सुरु असणारे अनधिकृत प्लॉटिंग व बांधकामांबाबत पीएमआरडीए (PMRDA) आयुक्तांना निवेदन देत संबंधित बांधकामांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दिलेल्या निवेदनानुसार, संबंधित जागेवर कोणतीही परवानगी न घेता मोठ्या प्रमाणात प्लॉटिंग व बांधकाम सुरू आहे. याबाबत यापूर्वीही संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आणून देण्यात आली होती. संबंधित अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन तसेच लेखी स्वरूपात वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप अनधिकृत बांधकामावर अपेक्षित कारवाई झालेली नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. उलट संबंधित बांधकाम करणाऱ्यांना काही अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे पाठबळ मिळत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
दरम्यान, गोरगरीब, कष्टकरी आणि सर्वसामान्य नागरिक आयुष्यभराची पुंजी जमवून स्वतःच्या घराचे स्वप्न पाहतात. अशा नागरिकांना प्लॉट विकताना चुकीची माहिती किंवा भविष्यातील विकासाची आश्वासने देऊन आर्थिक नुकसान केले जात आहे का? पीएमआरडीएने गट नं. २३३/१ ची तातडीने पाहणी करून जमीन व प्लॉटिंगशी संबंधित कागदपत्रे, परवानग्या आणि ले-आऊटची तपासणी करावी. अनधिकृतता आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी. तसेच तक्रारीनंतरही वेळेत कारवाई न केल्याच्या आरोपांची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, असे या निवेदनात म्हटले


















