- शाडू मातीच्या गणेशमूर्तीतून हरित गणेशोत्सवाचा संदेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ सप्टेंबर २०२६) :- गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत आहेत. ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२६’ आणि ‘माझी वसुंधरा ७.०’ अभियानांतर्गत ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रभाग क्रमांक २३ मधील यशवंतराव चव्हाण विद्यालय, थेरगाव येथे विद्यार्थ्यांसाठी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा घेण्यात आली.
विद्यार्थ्यांनी शाडू माती व नैसर्गिक साहित्याचा वापर करून गणेशमूर्ती साकारल्या. तसेच कागद, कापड, बांबू, पाने आणि नैसर्गिक फुलांपासून सजावट करण्याचे आवाहन करण्यात आले. थर्माकोल व एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकचा वापर टाळण्याबाबतही जनजागृती करण्यात आली.
महापौर रवि लांडगे, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम आणि उपआयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी सहायक आरोग्य अधिकारी अतुल सोनवणे, आरोग्य निरीक्षक गोपाल धस, आरोग्य सहाय्यक सचिन उघडे व मुख्याध्यापक शिवाजी दौंडकर उपस्थित होते.


















