- पासवर्डचा गैरवापर करून रक्कम स्वतःच्या खात्यावर वळविल्याचा आरोप…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ सप्टेंबर २०२६) :- कंपनीच्या बँक खात्याचा पासवर्ड गैरवापरून तब्बल ५ कोटी ६७ लाख ६ हजार ५९२ रुपयांची रक्कम स्वतःच्या बँक खात्यावर वळवून अपहार केल्याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात अकाउंटंटविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमित दिलीप परदेशी (वय ३८, रा. जुन्नर, पुणे) असे आरोपीचे नाव आहे.
याप्रकरणी विकासक मुकेश कुमार बासिस्ट नारायण साह (वय ४६, रा. द वेस्ट फोर्ड सोसायटी, पिंपळे सौदागर) यांनी वाकड पोलिसांत फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ जानेवारी २०२५ पासून आतापर्यंत वेळोवेळी पिंपळे निलख येथील मिलिंद सोसायटी, जगताप डेअरी चौक परिसरातील कार्यालयात हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत नमूद आहे. आरोपी हा फिर्यादी यांच्या कार्यालयात अकाउंटंट म्हणून काम करीत होता.
कंपनीच्या बँक व्यवहारांसाठी फिर्यादी यांनी विश्वासाने आरोपीला पासवर्ड दिला होता. या पासवर्डचा गैरवापर करून आरोपीने कंपनीच्या नावावर असलेल्या बँक खात्यातून एकूण ५ कोटी ६७ लाख ६ हजार ५९२ रुपयांची रक्कम स्वतःच्या नावाच्या बँक खात्यात वळती केल्याचा आरोप आहे. त्यानंतर सदर रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
तसेच कंपनीच्या नावावर असलेल्या द फेडरल बँकेच्या बँक स्टेटमेंटमध्ये बनावटपणा करून बनावट बँक दस्तऐवज तयार करण्यात आले. हे स्टेटमेंट खरे असल्याचे भासवून फिर्यादीची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे.
याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहितेतील कलम ३१६ (४), ३१८ (४), ३३६ (२), ३३८ आणि ३४० (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेचे सपोनि सचिन घाटे करीत आहेत.


















