न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चाकण (दि. १६ सप्टेंबर २०२६) :- डंपरचा हॉर्न वाजविल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून दोघांनी चालकाला शिवीगाळ करत लोखंडी टॉमीने डोक्यात मारहाण केल्याची घटना चाकण येथील नाणेकरवाडी परिसरात घडली. या हल्ल्यात चालक गंभीर जखमी झाला आहे.
याप्रकरणी संकेत जाधव (वय २४, रा. जाधववाडी, चिखली) यांनी चाकण दक्षिण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार हरिदास रामकिसन कलबोले आणि लखन तातेराव आवले यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ सप्टेंबर रोजी रात्री सव्वादहा वाजण्याच्या सुमारास फिर्यादीचा डंपर चालक महादेव शंकर सोळंके हा टाटा कंपनीच्या डंपरमधून नाणेकरवाडी येथील स्क्रॅप गोदामातून माल घेऊन बाहेर येत होता. त्यावेळी आरोपींनी डंपरच्या हॉर्नचा राग मनात धरून चालकाला अडविले.
यावेळी आरोपींनी त्याच्याशी वाद घालत शिवीगाळ केली. त्यानंतर लोखंडी टॉमी काढून चालकाच्या डोक्यात वार केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात चालक जखमी झाला. घटनेनंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.


















