- कालावधी उलटूनही काम अपूर्णच…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १६ सप्टेंबर २०२६) :- पिंपरी कॅम्प, पिंपरी गाव, पिंपळे सौदागर आणि रहाटणी या भागांना जोडणाऱ्या मिलिटरी डेअरी फार्म परिसरातील उड्डाणपुलाचे काम अपेक्षित कालावधीत पूर्ण न झाल्याने महापालिकेने ठेकेदाराविरोधात कारवाई सुरू केली आहे. ‘टी अँड टी इन्फ्रा’ या ठेकेदार कंपनीला १ सप्टेंबरपासून दररोज एक हजार रुपये दंड आकारण्यात येत आहे.
पुणे-लोणावळा रेल्वेमार्गावर हा उड्डाणपूल उभारण्यात येत असून, त्यासाठी संरक्षण विभागाच्या जागेचा वापर केला जात आहे. या प्रकल्पाला ३१ मार्च २०२३ रोजी सुरुवात झाली होती. काम पूर्ण करण्यासाठी दोन वर्षांची मुदत देण्यात आली होती. मात्र, विविध कारणांमुळे प्रकल्पाची गती अपेक्षेप्रमाणे राहिली नाही.
उड्डाणपुलाच्या कामासाठी झाडे हटविणे तसेच रेल्वे विभागाकडून आवश्यक परवानग्या मिळविण्यास विलंब झाला. त्यामुळे मूळ मुदतीत प्रकल्प पूर्ण होऊ शकला नाही. महापालिकेकडून या कामाला तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली. तिसऱ्या मुदतवाढीनंतरही ३१ मार्च २०२५ पर्यंत काम पूर्ण झाले नाही. स्थापत्य प्रकल्प विभागाकडून पुढील मुदतवाढ देण्यात आली होती. ३१ जुलैपर्यंत या प्रकल्पाचे सुमारे ८५ टक्के काम पूर्ण झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र, उर्वरित काम पूर्ण न झाल्याने महापालिकेने आर्थिक स्वरूपाची कारवाई करण्याचा निर्णय घेतला.
कामाला गती देण्यासाठी १ ऑगस्टपासून ठेकेदारासाठी भाववाढीचा निर्देशांक गोठविण्यात आला. त्यानंतरही प्रकल्प पूर्णत्वास न गेल्याने १ सप्टेंबरपासून दररोज एक हजार रुपयांचा दंड आकारण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या कारवाईची माहिती स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता विजय भोजने यांनी दिली. उड्डाणपूल पूर्ण झाल्यानंतर या भागातील वाहतुकीला पर्यायी जोडणी मिळणार असून, पिंपरी कॅम्प, पिंपरी गाव, पिंपळे सौदागर आणि रहाटणी भागातील नागरिकांना त्याचा उपयोग होणार आहे.


















