- चोरीच्या सोन्याच्या मोबदल्यातील दोन लाखांची रोकड जप्त..
- गुन्हे शाखा युनिट-३ची कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १६ सप्टेंबर २०२६) :- शेलपिंपळगाव येथील मोहितेवाडी परिसरात घरफोडी करून सोन्याचे दागिने चोरणाऱ्या आरोपींपैकी एकाला गुन्हे शाखा युनिट-३च्या पथकाने अहिल्यानगर जिल्ह्यातून ताब्यात घेतले. फिलीप नादर चव्हाण (वय ३३, रा. चिचोंडी पाटील, ता. जि. अहिल्यानगर) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून दोन लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ जुलै २०२६ रोजी सकाळी ११.३० ते दुपारी २.३० या कालावधीत ढासे वस्ती, मोहितेवाडी, शेलपिंपळगाव येथे अमोल एकनाथ पोतले यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा व कुलूप हत्याराच्या सहाय्याने तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. बेडरूममधील कपाटाचे लॉकर उघडून त्यातील सोन्याचे दागिने चोरी करण्यात आले होते. याप्रकरणी चाकण दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६२२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१(३), ३०५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हे शाखा युनिट-३चे पथक समांतर तपास करत असताना सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा माग काढण्यात आला. तसेच पोलीस हवालदार सोनवणे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे फिलीप चव्हाण याला चिचोंडी पाटील येथून ताब्यात घेण्यात आले.
चौकशीत त्याने साथीदार छगन चिंतामण काळे (रा. कडा, आष्टी, जि. बीड) याच्यासोबत मिळून घरफोडी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. चोरीच्या सोन्याच्या मोबदल्यातून छगन काळे याने फिलीप चव्हाणला दोन लाख रुपये दिले होते. ही दोन लाखांची रोकड पोलिसांनी चव्हाणकडून जप्त केली आहे.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भरत गोसावी, सुनील जावळे तसेच पोलीस अंमलदार सोनवणे, भोसुरे, इचके, साबळे, खेडकर, गुंजाळ, राळे, दांगट व थोरात यांच्या पथकाने केली. पुढील तपास चाकण दक्षिण पोलीस ठाणे करीत आहे.


















