- स्थायी समितीच्या बैठकीत प्रस्तावावर बुधवारी चर्चा, निर्णय प्रतिक्षेत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १६ सप्टेंबर २०२६) :- शहरातील वाढलेली, धोकादायक आणि अडथळा निर्माण करणारी झाडे तसेच त्यांच्या फांद्यांची छाटणी करण्यासाठी स्वतंत्र धोरण तयार करण्याचे विचाराधीन आहे. छाटणी किंवा धोकादायक झाडे तोडल्यानंतर मिळणाऱ्या लाकडाचा योग्य पद्धतीने वापर करून ते स्मशानभूमींमध्ये अंत्यविधीसाठी इंधन म्हणून उपलब्ध करून देण्याचा देखील विचार केला जात आहे, अशी माहिती महापालिका स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
स्थायी समितीच्या बैठकीत या विषयावर चर्चा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. शहरात अनेक ठिकाणी धोकादायक झाडे किंवा वाढलेल्या फांद्यांमुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र, अशी झाडे तोडण्यासाठी किंवा छाटणी करण्यासाठी नागरिकांना परवानगी मिळण्यास विलंब होत असल्याच्या तक्रारी आहेत. दुसरीकडे, छाटणीनंतर मोठ्या प्रमाणात फांद्या व लाकूड निर्माण होते. हे साहित्य अनेकदा इतरत्र टाकले जाते किंवा त्याचा पुरेसा उपयोग होत नाही.
या पार्श्वभूमीवर छाटलेल्या झाडांपासून मिळणारे लाकूड संकलित करून शहरातील स्मशानभूमींमध्ये इंधन म्हणून वापरण्याची व्यवस्था करण्याचा विचार महापालिका करत आहे. त्यामुळे झाडांच्या अवशेषांचा पुनर्वापर होण्यासोबतच स्मशानभूमींमध्ये अंत्यविधीसाठी लागणाऱ्या लाकडाचा खर्च कमी होण्यास मदत होऊ शकते.
धोकादायक झाडांबाबत नागरिकांना वेळेत परवानगी मिळावी, छाटणीचे काम नियमानुसार व्हावे आणि निर्माण होणाऱ्या लाकडाचा नागरिकहितासाठी उपयोग व्हावा, यासाठी धोरणात्मक व्यवस्था उभारण्याचा प्रयत्न असल्याचे बारणे यांनी स्पष्ट केले.
“धोकादायक किंवा वाढलेली झाडे छाटताना निर्माण होणाऱ्या लाकडाचा अपव्यय होऊ नये, हा यामागचा उद्देश आहे. हे लाकूड शहरातील स्मशानभूमींमध्ये इंधन म्हणून वापरल्यास त्याचा सदुपयोग होईल. नागरिकांना अंत्यविधीसाठी मोफत किंवा कमी खर्चात सुविधा देण्यासही मदत होऊ शकते. यासाठी योग्य धोरण तयार करून त्याची अंमलबजावणी करण्याचा विचार आहे.”
-अभिषेक बारणे, सभापती.


















