- सात गावांचा कचरा मोशी येथे टाकण्यास ग्रामस्थांचा तीव्र विरोध..
- पर्यायी जागा निश्चित करण्याची नगरसेवक निखिल बोऱ्हाडे यांची मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १७ सप्टेंबर २०२६) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीत अद्याप अधिकृत समावेश न झालेल्या सात गावांचा कचरा मोशी येथील कचरा डेपोवर आणून टाकण्याच्या प्रस्तावाला मोशी ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. मोशी परिसरातील नागरिकांनी यापूर्वीच कचरा डेपोचा मोठा भार सहन केला असून, त्यात आणखी सात गावांचा कचरा टाकल्यास नागरिकांच्या आरोग्याबरोबरच पर्यावरणावरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे.
याबाबत नगरसेवक निखिल बोऱ्हाडे यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाला पत्र देऊन मोशी येथे सात गावांचा कचरा आणून टाकण्याची कार्यवाही तात्काळ थांबवावी, तसेच या गावांच्या कचरा व्यवस्थापनासाठी मोशी व्यतिरिक्त स्वतंत्र पर्यायी जागा निश्चित करावी, अशी मागणी केली आहे.
कचरा डेपोमुळे आधीच नागरिक त्रस्त..
मोशी येथील कचरा डेपो परिसरात पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागांतून यापूर्वीपासून मोठ्या प्रमाणात कचरा आणून टाकण्यात येत आहे. या कचरा डंपिंगच्या ठिकाणी यापूर्वी गंभीर दुर्घटनाही घडली आहे. त्या दुर्घटनेनंतर कचरा डेपो बंद करण्यात आलेला असतानाही आता आणखी सात गावांचा कचरा मोशी येथे आणण्याची कार्यवाही प्रशासनाकडून करण्यात येत असल्याचे निदर्शनास येत असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. मोशी कचरा डेपोच्या अगदी जवळ रुग्णालय असून, परिसरातील लोकसंख्याही दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत आहे. कचरा डेपोमुळे परिसरातील हवा, पाणी, नदी-नाले आणि पर्यावरणाच्या प्रदूषणाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असून, त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
मोशीवर आणखी कचऱ्याचा भार नको..
मोशी परिसरातील प्रलंबित समस्या सोडविण्याऐवजी आणखी सात गावांचा कचरा येथे आणून टाकण्याचा निर्णय योग्य ठरणार नाही. मोशी परिसरातील नागरिकांनी यापूर्वीच कचरा डेपोचा मोठा त्रास सहन केला आहे. त्यामुळे मोशीवर आणखी कचऱ्याचा भार टाकण्यास ग्रामस्थांचा ठाम विरोध असल्याचे नगरसेवक बोऱ्हाडे यांनी पत्रातून स्पष्ट केले आहे. सदर सात गावांचा अद्याप पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीत अधिकृत समावेश झालेला नसताना त्यांचा कचरा मोशी येथे आणणे म्हणजे मोशी परिसरातील नागरिकांवर अतिरिक्त भार टाकणे होय. भविष्यात या सात गावांचा महानगरपालिका हद्दीत समावेश झाला, तरी त्या गावांमधून निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रशासनाने स्वतंत्र नियोजन करून योग्य पर्यायी व्यवस्था करणे आवश्यक असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
स्वतंत्र पर्यायी जागा निश्चित करण्याची मागणी..
मोशी येथे या सात गावांचा कचरा टाकण्याची कोणतीही कार्यवाही तात्काळ थांबविण्यात यावी. तसेच सात गावांच्या कचरा व्यवस्थापनासाठी मोशी व्यतिरिक्त स्वतंत्र पर्यायी जागा तातडीने निश्चित करून शास्त्रोक्त व पर्यावरणपूरक कचरा व्यवस्थापनाची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. मोशी परिसरातील नागरिकांचे आरोग्य, पर्यावरण, नदी-नाले, वाढती लोकसंख्या तसेच भविष्यातील नागरी विकास या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून प्रशासनाने सदर निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.
प्रशासनाने मागणीची गांभीर्याने दखल घ्यावी..
मोशी ग्रामस्थांच्या मागणीकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष न दिल्यास नागरिकांच्या हितासाठी लोकशाही व कायदेशीर मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही पत्राद्वारे देण्यात आला आहे. मोशी परिसरातील कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न हा केवळ एका भागापुरता मर्यादित नसून, वाढती लोकसंख्या, आरोग्य, पर्यावरण आणि भविष्यातील नागरी विकासाशी संबंधित असल्याने प्रशासनाने दीर्घकालीन व शास्त्रोक्त नियोजन करावे, अशी भूमिका ग्रामस्थांकडून मांडण्यात आली आहे.
“सदर सात गावांचा अद्याप पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीत अधिकृत समावेश झालेला नाही. असे असताना या गावांचा कचरा मोशी येथे आणून टाकण्याचा निर्णय का घेतला जात आहे, हा प्रश्न आहे. मोशी परिसरातील नागरिकांनी यापूर्वीच कचरा व्यवस्थापनाचा मोठा भार सहन केला आहे. त्यात आणखी सात गावांचा कचरा मोशी येथे आणल्यास नागरिकांवर अतिरिक्त भार पडणार असून, आरोग्य व पर्यावरणाचा प्रश्नही गंभीर होऊ शकतो. त्यामुळे या निर्णयाला समस्त मोशी ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे. भविष्यात या सात गावांचा महापालिका हद्दीत समावेश झाला, तरी त्यांच्या कचरा व्यवस्थापनासाठी स्वतंत्र नियोजन करून योग्य पर्यायी व्यवस्था उभारणे आवश्यक आहे.” – निखिल बोऱ्हाडे, नगरसेवक तथा अध्यक्ष, ‘क’ प्रभाग (विजयदुर्ग) क्षेत्रीय कार्यालय…


















