न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १७ सप्टेंबर २०२६) :- देहूफाटा चौक, आळंदी येथे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी नियुक्त असलेल्या महिला पोलिस कर्मचाऱ्याशी हुज्जत घालत शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दिघी पोलिस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी सुमारे ११.१५ वाजता देहूफाटा चौक, आळंदी येथे हा प्रकार घडला. महिला पोलिस अंमलदार पुनम अमित तापकीर या वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी नियुक्त होत्या.
यावेळी तेजस रवींद्र ताम्हाणे (वय १९, रा. चऱ्होली बुद्रुक) आणि महिला (वय अंदाजे ४२, रा.चऱ्होली बुद्रुक) यांनी राँग साईडने वाहन घेऊन येत असल्याच्या कारणावरून महिला पोलिस कर्मचाऱ्याशी वाद घातल्याचे तक्रारीत नमूद आहे.
तक्रारीनुसार, संबंधितांनी महिला पोलिस कर्मचाऱ्याला अश्लील भाषेत शिवीगाळ करून ‘बघून घेण्याची’ धमकी दिली. तसेच राँग साईडने वाहन बेदरकारपणे चालविल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी दिघी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता तसेच मोटार वाहन कायद्यातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस करीत आहेत.

















