- गौरी-गणपती उत्सवाचे कारण पुढे करत बहुसंख्य नगरसेवकांची सभेला दांडी..
- ‘कोरम’वरून विरोधी पक्षनेत्यांचा सभागृह नेत्यांना टोमणा..
- महापौरांकडून तहकूब सभा पुन्हा नव्याने महिनाभर तहकूब…
मा. अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी | दि. १७ सप्टेंबर २०२६ :- पिंपरी-चिंचवड महापालिकेची तहकूब सर्वसाधारण सभा आज बुधवारी (दि. १७) महापौर रवि लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. मात्र, गौरी-गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे अनेक नगरसेवक सभेला अनुपस्थित राहिल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी मांडण्यात आलेल्या ठरावावेळीही सभागृहात मोठ्या प्रमाणात नगरसेवक उपस्थित नसल्याने विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी ‘कोरम’चा मुद्दा उपस्थित करत सभागृह नेत्यांना टोला लगावला.
सभेच्या सुरुवातीला भाजपचे सभागृह नेते प्रशांत शितोळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारा ठराव मांडला. यावेळी त्यांनी मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या ठरावाला विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी अनुमोदन देत पंतप्रधान मोदी यांना शुभेच्छा दिल्या त्यांच्या कार्याचा गौरव केला.
यावेळी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी उपस्थितीचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, “आज मोठ्या व्यक्तीचा वाढदिवस आहे. मात्र, मोठ्या प्रमाणात नगरसेवक उपस्थित नाहीत. कोरम पूर्ण असता तर मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली असती,” असा टोला त्यांनी सभागृह नेते प्रशांत शितोळे यांना लगावला.
शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मोदी यांची भेट घेतल्याचा संदर्भ देत बारणे यांनी त्यांच्या आपुलकीच्या स्वभावाचा उल्लेख केला. “पंतप्रधान कसा असावा, याचे जिवंत उदाहरण त्यांच्या भेटीनंतर जाणवले. दुसऱ्यांदा भेटीस गेलो असता त्यांनी मला ‘या कॉर्पोरेटरजी’ असे म्हणत आपुलकीने संबोधले,” असा अनुभव त्यांनी सभागृहात सांगितला.
दरम्यान, गौरी-गणपती उत्सवामुळे नगरसेवकांची उपस्थिती कमी असल्याचा मुद्दा सभागृह नेते प्रशांत शितोळे यांनी मांडला. त्यामुळे आजची तहकूब सर्वसाधारण सभा पुढील महिन्यात १५ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजेपर्यंत तहकूब करण्याची विनंती करण्यात आली होती. त्यानंतर महापौर रवि लांडगे यांनी सभा १५ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब केली.
सभेच्या प्रारंभी निगडी येथील मयत चिमुकली संस्कृती तसेच जुन्नरच्या नेत्या आशा बुचके, मावळचे माजी आमदार मदन बाफना, माजी नगरसेविका फुगे यांच्यासह शहरातील दिवंगत व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
दरम्यान गणेशोत्सवाच्या काळात महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला नगरसेवकांची मोठ्या प्रमाणातील अनुपस्थिती आणि त्यानंतर सभा पुन्हा महिनाभरासाठी तहकूब करण्याचा निर्णय यामुळे विषयपत्रिकेवरील शहराच्या हिताचे निर्णय पुन्हा महिनाभर लांबणीवर पडले आहेत.

















