- उच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित असतानाही प्रकल्प सुरू..
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आम आदमी पार्टीची मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २७ ऑक्टोबर २०२६) :- चिंचवडच्या आनंदनगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात खोटी संमतीपत्रे व कागदपत्रे सादर करून शासनाची दिशाभूल केल्याचा आरोप करत रेणुका कन्स्ट्रक्शनचे विकसक बाबू मेत्रे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी आम आदमी पार्टी युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष रविराज काळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
आनंदनगरमधील जागेच्या मालकीवरून वाद असून, प्रकरण उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. तरीही पुनर्वसनाचे काम सुरू असल्याचा आरोप काळे यांनी केला. सर्वेक्षणात ९० टक्के झोपडीधारक अपात्र ठरविल्याचेही त्यांनी नमूद केले.
अनेकांची घरे पाडूनही पर्यायी निवास व दरमहा भाडे दिले जात नसल्याचा आरोप आहे. प्रकल्पाला तातडीने स्थगिती देऊन संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. न्याय न मिळाल्यास झोपडीधारकांसह एसआरए कार्यालयात मुक्काम आंदोलन करण्याचा इशाराही आम आदमी पार्टीने दिला आहे.


















