न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २७ ऑक्टोबर २०२६) :- अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात कारवाई करताना पळून जाणाऱ्या संशयित आरोपीचा पाठलाग करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना पिंपरी-चिंचवडमध्ये घडली. जावेद बागसिराज (वय ४०) असे मृत पोलिस कर्मचाऱ्याचे नाव असून, त्यांच्या निधनाने पोलिस दलावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री संत तुकारामनगर परिसरात एमडी (मेफेड्रोन) या अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी दोन जण येणार असल्याची माहिती अमली पदार्थविरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचला. कारवाईदरम्यान पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले; मात्र, त्याचा साथीदार पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला.
त्याला पकडण्यासाठी जावेद बागसिराज यांनी पाठलाग सुरू केला. याचदरम्यान त्यांच्या छातीत अचानक तीव्र वेदना सुरू झाल्या आणि ते जमिनीवर कोसळले. सहकारी पोलिसांनी त्यांना तातडीने पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांना पुन्हा हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.
जावेद बागसिराज हे २०१० मध्ये पुणे शहर पोलिस दलात भरती झाले होते. हडपसर आणि मुंढवा पोलिस ठाण्यांमध्ये त्यांनी सुरुवातीची आठ वर्षे सेवा बजावली. २०१८ मध्ये पिंपरी-चिंचवड स्वतंत्र पोलिस आयुक्तालयाची स्थापना झाल्यानंतर ते या पोलिस दलात रुजू झाले. त्यानंतर पिंपरी पोलिस ठाण्यात सेवा बजावल्यानंतर त्यांनी गुन्हे शाखेत काम केले. सध्या ते अमली पदार्थविरोधी पथकात कार्यरत होते.
जावेद यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, पत्नी, १२ वर्षांची मुलगी आणि सात वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. कर्तव्य बजावत असताना त्यांचा अचानक मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दोन चिमुकल्यांच्या डोक्यावरील पितृछत्र हरपल्याने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. या दुर्दैवी घटनेमुळे पिंपरी-चिंचवड पोलिस दलात शोक व्यक्त केला जात आहे.











![[ ब्रेकिंग न्यूज] आरोपीचा पाठलाग करताना हृदयविकाराचा झटका; पोलिस दलावर शोककळा..](https://newspcmc.com/wp-content/uploads/2026/10/IMG-20261026-WA0263-1-90x60.jpg)
![[ ब्रेकिंग न्यूज] आरोपीचा पाठलाग करताना हृदयविकाराचा झटका; पोलिस दलावर शोककळा..](https://newspcmc.com/wp-content/uploads/2026/10/images-8-90x60.jpeg)





