- संस्थेचे खजिनदार आणि सचिवांकडून एकाला मारहाण..
- चिखली पोलिसांत गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २७ ऑक्टोबर २०२६) :- रुपीनगर, तळवडे येथील नवमहाराष्ट्र माध्यमिक विद्यालयात एका कर्मचाऱ्याला शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप समोर आला आहे. या प्रकरणी संस्थेच्या खजिनदार आणि सचिवांविरुद्ध चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळेतील काम आणि कर्मचाऱ्याच्या वागणुकीवरून चर्चा सुरू असताना संबंधितांना कार्यालयात बोलावण्यात आले. त्यानंतर अपमानास्पद बोलणे, शिवीगाळ आणि धमकी दिल्याचा आरोप आहे. पुढे दोघांनी हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून तक्रारदाराला भिंतीवर ढकलल्याने त्यांच्या डोक्याला दुखापत झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.
२३ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी सुमारे १२.२० वाजता भैरवनाथ एज्युकेशन सोसायटीच्या नवमहाराष्ट्र माध्यमिक विद्यालयात ही घटना घडली. दिलीप दत्तात्रय पांडुळे (वय ३९) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. या प्रकरणी किशोर गौड आणि आशीष गौड यांच्याविरुद्ध २६ ऑक्टोबर २०२६ रोजी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.


















