न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २६ ऑक्टोबर २०२६) :- रावेतमध्ये आईस्क्रीम विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या एका तरुणासह दोघांकडे ३ लाखांपेक्षा अधिक किमतीचा मेफेड्रॉन (एमडी) हा अंमली पदार्थ आढळून आला. विक्रीसाठी हा साठा बेकायदेशीररीत्या जवळ बाळगल्याप्रकरणी रावेत पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, एकाला अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई रविवार, दि. २५ ऑक्टोबर रोजी पहाटे २.३५ च्या सुमारास रावेत बीआरटी रस्त्यालगत, स्टेलेस्टीयल सिटी सोसायटीकडे जाणाऱ्या रस्त्याजवळील एका शाळेमागील मोकळ्या जागेत करण्यात आली.
चैतन्य श्याम कांबळे (वय २०, रा. रावेत) आणि कैलाश देवजी चौधरी (वय २६, रा. रावेत) अशी आरोपींची नावे आहेत. कैलाश चौधरी हा आईस्क्रीम विक्रीचा व्यवसाय करतो. मात्र, आईस्क्रीम विक्रीच्या व्यवसायाशी या अंमली पदार्थांचा काही संबंध आहे का, याबाबत पोलिस अधिक तपास करीत आहेत.
या प्रकरणी पोलीस शिपाई सौदागर देविदास लामतुरे यांनी फिर्याद दिली आहे. रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कैलाश चौधरी याला अटक करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खिळे करीत आहेत.

















