- ११० टन क्षमतेच्या मशीनवर काम करण्यास भाग पाडल्याचा आरोप..
- ठेकेदार सुपरवायझर आणि कंपनी कॉन्ट्रॅक्टरवर कारवाईचा बडगा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २७ ऑक्टोबर २०२६) :- खालुंब्रे येथील एका कंपनीत मशीनवर काम करताना २१ वर्षीय कामगाराच्या हाताला गंभीर दुखापत झाल्याची घटना समोर आली आहे. मशीन चालवण्याचा अनुभव नसतानाही काम करण्यास सांगितल्याने हा अपघात झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी सुमारे ११.३० वाजता ऑटो-कॅम्प कॉर्पोरेशन पानसे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत हा प्रकार घडला. अभिषेक औधेश पटेल असे जखमी कामगाराचे नाव आहे.
कंपनीतील मशीन बंद पडल्याने ११० टन क्षमतेच्या मशीनवर काम करण्यास सांगण्यात आले. संबंधित कामाचा अनुभव नसतानाही कंपनीतील सुपरवायझर आणि कॉन्ट्रॅक्टर सुपरवायझर यांनी जबरदस्तीने काम करण्यास सांगितल्याचा आरोप आहे. काम करताना तक्रारदाराचा हात व पंजा मशीनमध्ये अडकून गंभीर दुखापत झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी उत्तर महाळुंगे पोलीस ठाण्यात २६ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार तपास सुरू आहे.


















