न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २७ ऑक्टोबर २०२६) :- यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे (वायसीएम) अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. दोन दिवसांत खुलासा सादर करण्याचे निर्देश देतानाच, उत्तर न मिळाल्यास उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे एकतर्फी कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
माजी सहायक प्राध्यापक डॉ. ज्ञानेश्वर बोराडे यांनी केलेल्या तक्रारीनंतर संत तुकारामनगर पोलिस ठाण्यात डॉ. वाबळे यांच्याविरोधात अॅट्रॉसिटी चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे महापालिका प्रशासनानेही दखल घेतली असून, संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येऊ नये, असा सवाल नोटिशीत उपस्थित करण्यात आला आहे.
नियुक्तीच्या वादातून प्रकरण पेटले…
डॉ. बोराडे हे वायसीएम रुग्णालयात सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. नियुक्ती, अनुपस्थिती, विभागीय चौकशी आणि सेवेतून कमी करण्याच्या कारवाईवरून त्यांचा डॉ. वाबळे यांच्याशी वाद सुरू असल्याचे समोर आले आहे. तक्रारीनुसार, १० ऑगस्ट रोजी अनुभव प्रमाणपत्र घेण्यासाठी डॉ. बोराडे रुग्णालयात गेले होते. त्यावेळी नियुक्तीसंदर्भातील नोंदींबाबत विचारणा केली असता, डॉ. वाबळे यांनी जातिवाचक शब्द वापरून सार्वजनिक ठिकाणी अपमान केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या आरोपांच्या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी खुलासा मागविला आहे. आता डॉ. वाबळे यांच्याकडून मुदतीत काय उत्तर सादर केले जाते आणि त्यानंतर महापालिका प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे.

















