- पिंपरी-चिंचवड आरटीओकडून आदेश जारी..
- तब्बल पाच वाहनांवर कारवाई; त्या कंपनीवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २७ ऑक्टोबर २०२६) :- रॅपिडो (Rapido) कंपनीकडे पुणे जिल्ह्यासाठी बाईक टॅक्सी चालविण्याचा वैध अॅग्रीगेटर परवाना नसल्याचे स्पष्ट करत प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवड यांनी नागरिकांना रॅपिडो बाईक टॅक्सी अॅपचा वापर न करण्याचे आवाहन केले आहे. तसेच दुचाकी वाहनमालकांनी आपली खासगी वाहने या अॅपवर नोंदवू नयेत, असेही आरटीओने स्पष्ट केले आहे.
प्रादेशिक परिवहन कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, रॅपिडो कंपनी पुणे जिल्ह्यात आवश्यक अॅग्रीगेटर परवाना न घेता बाईक टॅक्सी व्यवसाय करत असल्याचे निदर्शनास आले आहे. यासंदर्भात १५ ऑक्टोबर २०२६ रोजी पुण्याचे जिल्हाधिकारी तथा प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली होती. या बैठकीला प्राधिकरणाचे सदस्य, अॅग्रीगेटर कंपन्यांचे प्रतिनिधी तसेच ऑटोरिक्षा आणि टॅक्सी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
या बैठकीत रॅपिडो कंपनीने ई-बाईक टॅक्सीचा वैध परवाना मिळेपर्यंत पुणे जिल्ह्यातील विनापरवाना बाईक टॅक्सी सेवा तातडीने बंद करावी, असे निर्देश देण्यात आले होते. तसेच विनापरवाना व्यवसाय सुरू असल्याचे आढळल्यास संबंधित कंपनीविरुद्ध पोलिसांमार्फत गुन्हा दाखल करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या.
मात्र, कंपनीचे बाईक टॅक्सी अॅप सुरू असल्याने प्रादेशिक परिवहन कार्यालयाने २६ ऑक्टोबर २०२६ रोजी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याला कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याबाबत कळविले आहे. याशिवाय रॅपिडोचे अॅप बंद करण्याबाबत पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त यांनाही पत्राद्वारे कळविण्यात आले आहे.
दरम्यान, आरटीओच्या वायुवेग पथकाने रॅपिडो अॅपच्या माध्यमातून बाईक टॅक्सी व्यवसाय करणाऱ्या पाच वाहनांवर दंडात्मक कारवाई केली असून, एकूण ५६ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
खासगी दुचाकीमालकांनाही इशारा…
नागरिकांनी रॅपिडो बाईक टॅक्सी अॅपचा वापर करू नये. तसेच खासगी संवर्गातील दुचाकी वाहने या अॅपवर नोंदवू नयेत. तपासणीदरम्यान अशी वाहने आढळल्यास संबंधित वाहनमालकांविरुद्ध मोटार वाहन कायदा व नियमांनुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवड यांच्याकडून देण्यात आला आहे.
नागरिकांनी कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी संबंधित सूचनांचे पालन करावे, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवड यांनी केले आहे.

















