- किरकोळ कारणावरून मर्डर; एक अटकेत दुसरा फरार…!
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ११ नोव्हेंबर २०२६) :- चिखलीतील स्पाईन रोडवरील कृष्णानगर चौकाजवळ झाडीमध्ये आढळलेल्या अनोळखी तरुणाच्या मृत्यूचे गूढ अखेर उकलले आहे. नशा करण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून दोघांनी दगड आणि बांबूच्या काठीने मारहाण करून तरुणाचा खून केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या प्रकरणी चिखली पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून, दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे.
लाल बहादूर राम (रा. हरगुडेवस्ती, चिखली) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचे वय अंदाजे २५ ते ३० वर्षे होते. दि. ७ नोव्हेंबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास आरंभ हॉटेलसमोरील दोन रस्त्यांमधील महानगरपालिकेच्या मोकळ्या जागेतील झाडीमध्ये त्याचा मृतदेह आढळला होता. सुरुवातीला मृत तरुणाची ओळख पटत नसल्याने चिखली पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते.
पोलिस तपासात कमलेश रामहरक शर्मा (वय २०) आणि कौशल सुदामा कनोजिया (वय २४) यांनी नशा करण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून लाल बहादूर याला दगड आणि बांबूच्या काठीने मारहाण करून ठार मारल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणी राजेश रामललन गौतम (वय २४) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ९१५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १०३(१), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कमलेश शर्मा याला अटक करण्यात आली असून, कौशल कनोजिया याचा शोध सुरू आहे. चिखली पोलीस पुढील तपास करीत आहेत.
अनोळखी मृतदेहापासून सुरू झालेल्या तपासातून अखेर खुनाचा उलगडा झाल्याने चिखली पोलिसांच्या तपासाला महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे.

















