- राहुल देशपांडे यांच्या सुरेल गायनाने वाकडकर मंत्रमुग्ध..
- दिवाळी फराळासह सांस्कृतिक सोहळा उत्साहात…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
वाकड (दि. १२ नोव्हेंबर २०२६) : नगरसेवक राहुल कलाटे यांच्या पुढाकाराने वाकड येथील कमल प्रतिष्ठान माउंट लिटेरा स्कूल येथे आयोजित ‘दिवाळी संध्या आणि फराळ २०२६’ हा सांगीतिक कार्यक्रम उत्साहात पार पडला. राष्ट्रीय पुरस्कार विजेते प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांच्या सुरेल गायनाने उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले.
भारतीय शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीताची मेजवानी अनुभवण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. दिवाळीच्या आनंदात संगीत आणि फराळाची जोड मिळाल्याने कार्यक्रमाला विशेष रंगत आली. कला, संस्कृती आणि सामाजिक एकोपा जपण्याच्या उद्देशाने दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य हेमंतराव हरहरे, सभागृह नेते प्रशांत शितोळे, नगरसेविका सुलभा उबाळे, माजी महापौर नितीन काळजे यांच्यासह विविध राजकीय, सामाजिक क्षेत्रांतील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“स्थानिक नागरिकांना दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद एकत्रितपणे घेता यावा आणि भारतीय संगीतपरंपरेची ओळख अधिक दृढ व्हावी, हा या आयोजनामागील हेतू आहे. उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल सर्व रसिकांचे आभार,” असे राहुल कलाटे यांनी सांगितले.

















