- ५२ झाडांच्या अवैध वृक्षतोडीप्रकरणी रविराज काळे यांचा न्यायालयीन लढा..
- कोर्टाने खुलासा मागवला; १८ नोव्हेंबरला पुढील सुनावणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १२ नोव्हेंबर २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेलगत सुरू असलेल्या मे. सुखवानी असोसिएट्सच्या बांधकाम प्रकल्पातील ५२ झाडांच्या कथित अवैध वृक्षतोडीचे प्रकरण आता न्यायालयात पोहोचले आहे. या प्रकरणी विकासक आणि महापालिकेचे वृक्ष अधिकारी महेश गारगोटे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी आम आदमी पक्षाचे रविराज काळे यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. न्यायालयाने या अर्जाची दखल घेत संबंधितांकडून खुलासा मागवला आहे.
पाचवे सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग, पिंपरी यांच्या न्यायालयात हा अर्ज दाखल करण्यात आला आहे. ६ नोव्हेंबर रोजी झालेल्या सुनावणीनंतर गुरुमुख जंगलदास सुखवानी आणि वृक्ष अधिकारी महेश गारगोटे यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
झाडांच्या वयाच्या नोंदीत फेरफार करून हेरिटेज वृक्षांच्या नियमांपासून वाचण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप रविराज काळे यांनी केला आहे. त्यांच्या वतीने अॅड. सुप्रिया गायकवाड बाजू मांडत आहेत. येत्या १८ नोव्हेंबर २०२६ रोजी पुढील सुनावणी होणार असून, त्यावेळी न्यायालयात अधिकृत म्हणणे सादर केले जाणार आहे. या प्रकरणामुळे शहरातील पर्यावरणप्रेमींचे लक्ष न्यायालयीन प्रक्रियेकडे लागले आहे.


















