न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १२ नोव्हेंबर २०२६) :- स्वच्छ सर्वेक्षण २०२६ मध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेने देशात तिसरा आणि महाराष्ट्रात पहिला क्रमांक मिळवला आहे. मात्र, या पुरस्कारावरून आता प्रशासनावर टीका सुरू झाली आहे. मोशी कचरा डेपोतील दुर्घटनेत नऊ कामगारांचा मृत्यू आणि शहरातील कचऱ्याच्या समस्येच्या पार्श्वभूमीवर पुरस्काराच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.
“कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर उभे राहून पुरस्कारांचे तांत्रिक सोहळे साजरे करणे लज्जास्पद आहे,” अशी टीका प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष डॉ. विजयकुमार पाटील यांनी केली.
९,५०० गुणांच्या तांत्रिक निकषांवर मिळालेला बहुमान आणि प्रत्यक्ष शहरातील स्वच्छतेची परिस्थिती यामध्ये मोठी तफावत असल्याचा आरोप त्यांनी केला. डिजिटल डॅशबोर्ड, सात तारांकित मानांकन आणि कागदोपत्री नोंदींपेक्षा प्रत्यक्ष स्वच्छता महत्त्वाची आहे. मोशी दुर्घटनेची जबाबदारी निश्चित करून नागरिकांना कचरामुक्त शहराचा अनुभव द्यावा, अन्यथा हा पुरस्कार प्रशासकीय फार्स ठरेल, असा इशाराही डॉ. पाटील यांनी दिला.


















