- यशवंतनगरमधील एसआरए प्रकल्पात घरांचे वाटप – आयुक्त डॉ. सूर्यवंशी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १२ नोव्हेंबर २०२६) :- मोशी कचरा डेपो येथे ८ जुलै २०२६ रोजी झालेल्या भीषण दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांच्या पुनर्वसनासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दुर्घटनेतील मृत नऊ कर्मचाऱ्यांपैकी आठ जणांच्या कायदेशीर वारसांना पिंपरीतील यशवंतनगर येथील एसआरए प्रकल्पात मोफत सदनिका देण्यात येणार आहेत. याबाबत महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी १२ नोव्हेंबर रोजी आदेश जारी केला आहे.
महापालिका सभेने २ सप्टेंबर २०२६ रोजी यासंदर्भातील ठराव मंजूर केला होता. त्यानुसार आठ सदनिकांच्या वाटपाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मृत राहुल गायकवाड, महेश कुंभार, अक्षय सावंत, वामन कसबे, सनी माने, सुनील कोरके, भावेश वाणी यांच्या पत्नींना, तर रणजित पाटील यांच्या आईला सदनिका मिळणार आहे.
मृत नागेश गायकवाड यांच्या वारसांची कागदपत्रे अपूर्ण असल्याने त्यांची प्रक्रिया प्रलंबित ठेवण्यात आली आहे. आवश्यक कागदपत्रे सादर झाल्यानंतर त्यांनाही सदनिका देण्यात येणार आहे.
दरम्यान, दुर्घटनेतील मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य यापूर्वीच वितरित करण्यात आले आहे. आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त अण्णा बोदडे यांच्या अधिपत्याखाली ही कार्यवाही करण्यात आली.
मोशी कचरा डेपो दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखाची महापालिका प्रशासनाला पूर्ण जाणीव आहे. या कठीण प्रसंगी महापालिका प्रशासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना आवश्यक ते सर्वतोपरी सहकार्य करण्यात येत आहे. त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीसोबतच हक्काचा निवारा उपलब्ध करून देण्याबाबत महापालिका संवेदनशील असून, त्यांच्या पुनर्वसनासाठी प्रशासन कटिबद्ध आहे.
— डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिकामोशी कचरा डेपो दुर्घटनेत मृत्यू झालेल्या ९ कर्मचाऱ्यांच्या वारसांना सदनिका देण्यात येणार आहेत. त्यापैकी एका कर्मचाऱ्याच्या वारसा कडून अद्याप कागदपत्र पूर्तता केली नाही. त्यामुळे सध्या ८ सदनिका वाटप आदेश करण्यात आले आहेत. या ८ सदनिका यशवंतनगर येथील एसआरए प्रकल्पात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. संबंधित लाभार्थ्यांनी आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांना सदनिकांचा ताबा देण्यात येईल. यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन व निर्मूलन विभागामार्फत आवश्यक ती कार्यवाही करण्यात येत आहे.
— अण्णा बोदडे, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

















