- रमा मंगल फाउंडेशनच्या वतीने सलग सहाव्या वर्षी सामाजिक उपक्रम..
- मुलांना पुस्तके, फटाके आणि अल्पोपाहाराचे वाटप…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
रावेत (दि. १२ नोव्हेंबर २०२६) :- दिवाळीचा आनंद समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावा आणि कष्टकरी कुटुंबातील मुलांच्याही चेहऱ्यावर आनंद फुलावा, या उद्देशाने चिंचवड येथील रमा मंगल फाउंडेशनच्या वतीने रावेत येथील ‘मस्ती की पाठशाला’मध्ये दिवाळी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी फाउंडेशनचे सुमित कांबळे, गणेश ओगले, संतोष मोरजकर, सुभाष मालुसरे, फिरोज खान, महेश कुंभार, समीर कुरळे, व रावेत येथील मस्ती की पाठशालाच्या संचालिका प्राजक्ता रुद्रवार आदी उपस्थित होते.
पुणे जिल्हा महाराष्ट्र राज्य विद्युत सनियंत्रण समितीचे सदस्य तसेच चिंचवड विधानसभा शिवसेना शहर संघटक संतोष सौंदणकर यांच्या पुढाकाराने आयोजित या उपक्रमात त्यांच्या हस्ते मुलांना पुस्तके आणि फटाक्यांचे वाटप करण्यात आले. तसेच उपस्थित मुलांना अल्पोपाहार देण्यात आला. फाउंडेशनच्या वतीने सलग सहाव्या वर्षी हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी मनोगत व्यक्त करताना संतोष सौंदणकर म्हणाले, “दिवाळी हा आनंद, प्रकाश आणि माणुसकीचा सण आहे. समाजातील प्रत्येक मुलाला दिवाळीचा आनंद घेता यावा, त्याच्या चेहऱ्यावर हसू फुलावे, हीच आमची भावना आहे. कष्टकरी कुटुंबातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात प्रोत्साहन मिळावे, त्यांच्या हातात खेळण्यांसोबतच पुस्तकेही यावीत आणि त्यांची स्वप्ने मोठी व्हावीत, यासाठी आम्ही हा छोटासा प्रयत्न करत आहोत. केवळ दिवाळीपुरतेच नव्हे, तर वर्षभर या मुलांच्या पाठीशी उभे राहण्याचा आमचा प्रयत्न आहे. रमा मंगल फाउंडेशनच्या माध्यमातून सलग सहा वर्षे हा उपक्रम राबविता येत आहे, याचे समाधान आहे. मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि त्यांच्या निरागस हास्यातच आमच्या कामाचे खरे यश आहे.”
सामाजिक बांधिलकी जपत रमा मंगल फाउंडेशनने राबविलेल्या या उपक्रमामुळे कष्टकरी कुटुंबातील मुलांची दिवाळी अधिक आनंददायी झाली. सामाजिक कार्यातून सणांचा आनंद सर्वांपर्यंत पोहोचविण्याचा फाउंडेशनचा हा प्रयत्न कौतुकास्पद ठरला.

















