- इच्छुकांची धाकधूक वाढली..
- नऊ महिन्यांची प्रतीक्षा संपणार?..
- भाजपच्या सात नावांकडे लक्ष..
- शुक्रवारच्या सभेत निर्णय होण्याची शक्यता?..
- दीडशेहून अधिक दावेदारांमध्ये चुरस…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १८ नोव्हेंबर २०२६) :- महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक नियुक्तीचा प्रश्न अखेर मार्गी लागणार की पुन्हा लांबणीवर पडणार, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे. तब्बल नऊ महिन्यांपासून प्रलंबित असलेला दहा स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीचा प्रस्ताव शुक्रवारी (दि. २०) होणाऱ्या सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. सत्ताधारी भाजपकडून सात नावांची यादी ऐनवेळी सादर केली जाण्याची शक्यता असल्याने या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने ८४ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ३७, शिवसेना शिंदे गटाचे सहा आणि एक अपक्ष असे पक्षीय संख्याबळ आहे. या संख्याबळानुसार स्वीकृत नगरसेवकांच्या दहा जागांपैकी सात जागा भाजपच्या, तर तीन जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला येणार आहेत.
विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या तीन जागांसाठी आवश्यक अर्ज मार्च महिन्यातच दाखल केले होते. मात्र, भाजपमधील अंतर्गत चर्चेत सात नावांवर एकमत होत नसल्याने संपूर्ण नियुक्ती प्रक्रियेला ब्रेक लागला. प्रशासनाने राष्ट्रवादीच्या सदस्यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव सभेसमोर ठेवला होता; परंतु भाजपची यादी नसल्याने दहा जागांचा विषय पूर्णत्वास जाऊ शकला नाही.
दरम्यान, भाजपमध्ये स्वीकृत नगरसेवक पदासाठी मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. माजी नगरसेवक, विधानसभा निवडणुकीत अथवा महापालिका निवडणुकीत पराभूत झालेले उमेदवार, उमेदवारीसाठी माघार घेतलेले इच्छुक आणि पक्षासाठी दीर्घकाळ काम करणारे पदाधिकारी अशा विविध गटांतून दावेदारी केली जात आहे. भाजपमध्ये दीडशेपेक्षा अधिक इच्छुक असल्याची चर्चा आहे. जुन्या व निष्ठावान कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे पत्राद्वारे सातही जागांवर जुन्या कार्यकर्त्यांना संधी देण्याची मागणी केली आहे.
इच्छुकांची धाकधूक वाढली…
ऑगस्ट महिन्यातही हा प्रस्ताव सर्वसाधारण सभेसमोर आला होता. मात्र, २० ऑगस्टची सभा तहकूब झाल्यानंतर विधानपरिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे पुढील निर्णय नोव्हेंबरपर्यंत लांबला. आता पुन्हा प्रस्ताव सभेसमोर आल्याने नियुक्तीचा मार्ग मोकळा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र, भाजपमधील सात नावांबाबतचा अंतिम निर्णय अद्याप स्पष्ट नसल्याने शुक्रवारी प्रत्यक्ष नियुक्त्या होणार की पुन्हा राजकीय गणितांमुळे विषय रखडणार, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. नऊ महिन्यांचा कालावधी उलटूनही संधीच्या प्रतीक्षेत असलेल्या इच्छुकांची धाकधूक वाढली असून राष्ट्रवादीच्या तीन संभाव्य नियुक्त्यांचे भवितव्यही भाजपच्या निर्णयाशी जोडले गेले आहे.
“शुक्रवारी होणाऱ्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रलंबित विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न आहे. यामध्ये स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीची प्रक्रियाही पूर्ण केली जाणार आहे.” — प्रशांत शितोळे, सभागृह नेते, पिंपरी-चिंचवड महापालिका…

















