- क्रिडा सभापतींच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह?..
- महत्त्वाचा धोरणात्मक विषय पुन्हा लांबणीवर..
- महापालिकेच्या व्यायामशाळांचे धोरण रखडले…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी | दि. १७ नोव्हेंबर २०२६ :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क्रीडा विभागाशी संबंधित महत्त्वपूर्ण धोरणात्मक विषयांवर ठोस निर्णय घेण्याऐवजी क्रीडा, कला, साहित्य, पर्यटन व सांस्कृतिक समितीच्या सभेचे कामकाजच पुढे ढकलले जात असल्याचे चित्र समोर आले आहे. महापालिकेच्या मालकीच्या व्यायामशाळा चालविण्यासाठी सुधारित धोरण तयार करण्यात आले आहे. या विषयावर निर्णय घेण्याऐवजी समितीची सभा गुरूवारी 19 नोव्हेंबरपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. त्यामुळे समितीचे सभापती कैलास कुटे यांच्या कामकाजाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्रीडा, कला, साहित्य, पर्यटन विकास व सांस्कृतिक समितीची पाक्षिक सभा सोमवारी (दि.16) रोजी महापालिका सभागृहात आयोजित करण्यात आली होती. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती कैलास कुटे होते. यावेळी समितीचे इतर सदस्य आणि अधिकारी उपस्थित होते.
दरम्यान महापालिकेच्या मालकीच्या व्यायामशाळा सेवाशुल्क तत्त्वावर चालविण्यास देण्याबाबत यापूर्वीच क्रीडा धोरण मंजूर करण्यात आले होते. मात्र, या धोरणात पात्रता, प्राधान्यक्रम, शुल्क आकारणी आणि व्यायामशाळांच्या व्यवस्थापनाबाबत स्पष्टता नसल्याने सुधारित धोरणाचा मसुदा तयार करण्यात आला आहे. हा विषय केवळ प्रशासकीय स्वरूपाचा नसून महापालिकेच्या मालमत्तेचे व्यवस्थापन आणि शहरातील क्रीडा सुविधांच्या भवितव्याशी संबंधित आहे.
या धोरणात आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडूंना प्राधान्य, व्यायामशाळांसाठी किमान ५० सभासदांची अट, सकाळी ६ ते रात्री १० अशी वेळ, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांना मोफत सभासदत्व आणि महिलांना ५० टक्के शुल्क सवलत अशा महत्त्वपूर्ण तरतुदी प्रस्तावित आहेत. याशिवाय व्यायामशाळांची देखभाल, दुरुस्ती, सीसीटीव्ही, वीजबिल आणि कराराच्या अटींबाबतही नवीन नियम निश्चित करण्याचा प्रस्ताव आहे.
मग महत्त्वाच्या विषयावर निर्णय कधी?
महापालिकेच्या क्रीडा विभागाने सुधारित धोरणाचा मसुदा तयार करून समितीसमोर ठेवला असताना, त्यावर चर्चा करून पुढील कार्यवाही करण्याची जबाबदारी समितीची आहे. या समितीच्या शिफारशीनंतर प्रस्ताव स्थायी समितीमार्फत महापालिका सभेकडे जाणार आहे. मात्र, सभा तहकूब झाल्याने संपूर्ण निर्णयप्रक्रियेला विलंब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महापालिकेत धोरणे तयार होतात, प्रस्ताव तयार होतात, ते समित्यांपुढेही येतात; मात्र प्रत्यक्ष निर्णयाच्या वेळी कामकाज पुढे ढकलले जात असेल, तर अशा समित्यांच्या अस्तित्वाचा आणि कार्यक्षमतेचा उपयोग काय, असा सवाल उपस्थित होत आहे.
सभापतींच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह?
क्रीडा समितीचे अध्यक्ष सभापती कैलास कुटे आहेत. शहराच्या क्रीडा सुविधांशी संबंधित महत्त्वाचा विषय मार्गी लावण्यासाठी सभापतींनी पुढाकार घेणे अपेक्षित असताना सभा तहकूब होणे ही बाब लक्षवेधी ठरली आहे. महत्त्वाचे प्रस्ताव वेळेत मार्गी लावणे, विषयांवर चर्चा घडवून आणणे आणि निर्णयप्रक्रियेला गती देणे ही समितीच्या नेतृत्वाची जबाबदारी आहे. मात्र, धोरणासारखा महत्त्वाचा विषय प्रलंबित राहिल्याने सभापतींच्या कामकाजाबाबत प्रश्न निर्माण होत आहेत.
महापालिकेच्या क्रीडा धोरणाला अंतिम स्वरूप कधी मिळणार? सुधारित धोरण स्थायी समिती आणि महापालिका सभेपुढे कधी जाणार? तसेच शहरातील महापालिका व्यायामशाळांच्या व्यवस्थापनाबाबत स्पष्ट निर्णय कधी होणार? या प्रश्नांची उत्तरे आता 19 नोव्हेंबरच्या सभेत मिळणार की पुन्हा निर्णय लांबणीवर पडणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सभापतींशी संपर्क नाहीच…
या विषयावर क्रीडा समितीचे सभापती कैलास कुटे यांची बाजू जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी अनेक वेळा दूरध्वनीद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यांनी फोनला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
सभा तहकूबीचा निर्णय सभापतींचा असतो. काही कारणास्तव सभा तहकूब होऊ शकते. सोमवारची पुढील तहकूब सभा गुरूवारी होणार आहे. – पंकज पाटील, उपायुक्त, क्रिडा विभाग- पिंपरी-चिंचवड मनपा…


















