- कंपनीची फसवणूक; उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
उत्तर महाळुंगे (दि. १७ नोहेंबर २०२६) :- खेड तालुक्यातील मौजे वासुली येथील औद्योगिक क्षेत्रात असलेल्या दोन कंपन्यांच्या स्टोअरमधून तब्बल १५ कोटी ४० लाख ९२ हजार ८७६ रुपये किमतीच्या ॲल्युमिनियम साहित्याचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात १० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार ३ डिसेंबर २०१८ ते २० ऑगस्ट २०२६ या कालावधीत घडला. मौजे वासुली येथील औद्योगिक समूहाच्या दोन कंपन्यांच्या प्लांटमधील स्टोअरमध्ये उत्पादनासाठी आवश्यक असणारे चांगले मटेरियल, स्क्रॅप मटेरियल आणि पुनर्निर्मितीसाठी वापरण्यात येणारे ॲल्युमिनियम साहित्य साठवून ठेवण्यात आले होते.
या प्रकरणातील आरोपी क्रमांक १ योगेश मकवाना आणि आरोपी क्रमांक २ लहाणू पुणेकर हे स्टोअर ऑफिसर म्हणून कार्यरत होते. त्यांनी इतर आरोपींच्या मदतीने संगनमत करून स्वतःच्या विश्वासाचा गैरफायदा घेत स्टोअरमधील साहित्याचा अपहार केल्याचा आरोप आहे.
आरोपी क्रमांक ३ दीपक कोळेकर आणि आरोपी क्रमांक ४ प्रमोद होले हे कंपनीतील कंत्राटी कामगार, तर आरोपी क्रमांक ५ दिपेश तिवारी हा कंपनीच्या हेडहंटर कंपनीचा प्रतिनिधी असल्याचे तक्रारीत नमूद आहे. आरोपी क्रमांक ६ अजय पाटोळे आणि आरोपी क्रमांक ७ विठ्ठल साळुंखे यांनी ट्रान्सपोर्ट गाड्यांमध्ये साहित्य लोड करण्यास मदत केली. त्यानंतर आरोपी क्रमांक ८ जलालुद्दीन मोहम्मद, आरोपी क्रमांक ९ प्रदीप पटवा आणि आरोपी क्रमांक १० वसीम शेख या स्क्रॅप व्यावसायिकांना हे साहित्य विकण्यात आले.
या व्यवहारातून आरोपींनी संगनमत करून स्वतःचा आर्थिक फायदा करून घेत कंपनीचे सुमारे १५ कोटी ४० लाख ९२ हजार ८७६ रुपयांचे आर्थिक नुकसान केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. विशेष म्हणजे, मालमत्ता अपहारित असल्याची माहिती असूनही काही आरोपींनी वारंवार गैरलाभाच्या उद्देशाने साहित्य खरेदी केल्याचा आरोप आहे.
याप्रकरणी नितीन आनंदा सावंत (वय ३९, रा. शिरोली, ता. खेड, जि. पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून १६ नोव्हेंबर २०२६ रोजी उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक खरात या प्रकरणाचा तपास करीत आहेत.


















