- सुरक्षेच्या साधनांशिवाय काम सुरू; निष्काळजीपणामुळे तरुणाचा जीव गेला
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
हिंजवडी (दि. १७ नोहेंबर २०२६) :- बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत सुरक्षेच्या उपाययोजनांचा अभाव असल्याने चौथ्या मजल्यावरून पडून एका २३ वर्षीय कामगाराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मारुंजी येथील संत तुकारामनगर परिसरात घडली. महेश रामराव राठोड असे मृत कामगाराचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास मारुंजी येथील सर्व्हे क्रमांक १/२ मधील बांधकाम साइटवर ही घटना घडली. संबंधित बांधकाम ठिकाणी कामगारांच्या सुरक्षेसाठी संरक्षक जाळी लावण्यात आली नव्हती. तसेच कामगारांना सेफ्टी बेल्ट, हेल्मेट यांसारखी सुरक्षा साधनेही पुरविण्यात आली नव्हती.
महेश राठोड हा चौथ्या मजल्यावर मालवाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या मिनी क्रेनला ट्रॉली लावत असताना त्याचा तोल गेला. त्यामुळे तो खाली पडून गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला.
या प्रकरणी बांधकाम साइट मालक संतोष माणिक राठोड (वय ३८) आणि ठेकेदार अमोल दिलीप चव्हाण (वय ३९) यांच्याविरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.


















