- प्रशासकीय दृष्टिकोन आणि तांत्रिक आराखड्यावरच अहवाल सादर केला गेला..
- नागरिकांची बाजू बेदखल – डॉ. विजयकुमार पाटील…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १८ नोव्हेंबर २०२६) :- पिंपरी-चिंचवड शहरातील निगडी, आकुर्डी आणि रावेत परिसरात राबविण्यात येत असलेल्या महापालिकेच्या ‘हरित सेतू’ प्रकल्पाची तुर्कीयेतील अंटाल्या येथे सुरू असलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदल परिषदेत (UNFCCC COP31) प्रशंसा करण्यात आली आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर प्रकल्पाचे पर्यावरणपूरक आणि यशस्वी मॉडेल म्हणून सादरीकरण होत असताना, प्रत्यक्षात याच प्रकल्पामुळे स्थानिक नागरिकांना वाहतूक कोंडी, पार्किंगची समस्या आणि इतर गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याचा आरोप पुढे आला आहे. जागतिक व्यासपीठावर प्रशासनाकडून वस्तुस्थितीचा एकांगी आढावा मांडला जात असल्याची टीका प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष डॉ. विजयकुमार पाटील यांनी केली आहे.
महापालिकेच्या माध्यमातून सुमारे २०० कोटी रुपयांच्या हरित रोख्यांद्वारे (ग्रीन बॉण्ड्स) निगडी, आकुर्डी आणि रावेत परिसरातील २० किलोमीटर लांबीचे ३० रस्ते विकसित केले जात आहेत. या प्रकल्पाचे सादरीकरण अंटाल्या येथील परिषदेत महापालिकेच्या शहरी दळणवळण विभाग आणि तांत्रिक सल्लागार संस्थांकडून करण्यात आले. रस्त्यांवरील वाहतुकीच्या जागेत १३ टक्के वाढ, समांतर पार्किंगची व्यवस्था आणि प्रकल्पापूर्वी ३० हून अधिक नागरिक चर्चासत्रे घेतल्याचे दावे यावेळी मांडण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
मात्र, निगडी प्राधिकरण परिसरातील नागरिकांच्या मते प्रत्यक्ष परिस्थिती वेगळी आहे. रुंद पदपथ आणि सायकल ट्रॅकमुळे रस्त्यांची उपलब्ध जागा कमी झाल्याची भावना वाहनचालकांमध्ये आहे. परिणामी गर्दीच्या वेळेत वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनत असून, रुग्णवाहिका आणि अग्निशमन वाहनांनाही मार्ग काढताना अडचणी येत असल्याच्या तक्रारी आहेत. उंच पदपथांमुळे पावसाळ्यात घरांमध्ये पाणी शिरणे, वाहनांसाठी पार्किंगची जागा अपुरी पडणे आणि पदपथांवर फेरीवाल्यांचे अतिक्रमण वाढणे अशा समस्याही नागरिकांकडून उपस्थित केल्या जात आहेत.
विशेष म्हणजे, या प्रकल्पासाठी खासगी आणि आंतरराष्ट्रीय सल्लागार संस्थांवर सुमारे एक कोटी ६८ लाख रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. एवढा खर्च करूनही स्थानिक भौगोलिक परिस्थिती, रस्त्यांची प्रत्यक्ष गरज आणि नागरिकांच्या अपेक्षांचा पुरेसा विचार झाला का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. परदेशातील वाहतूक व्यवस्थेचे प्रारूप स्थानिक परिस्थितीचा योग्य अभ्यास न करता राबविल्याची टीकाही होत आहे.
जागतिक कौतुकापेक्षा स्थानिक समाधान महत्त्वाचे!…
एकीकडे प्रकल्पाला आंतरराष्ट्रीय स्तरावर शाश्वत विकासाचे मॉडेल म्हणून सादर केले जात असताना, दुसरीकडे त्याच प्रकल्पाबाबत स्थानिक पातळीवर नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे केवळ सादरीकरण आणि तांत्रिक आकडेवारीच्या आधारे प्रकल्पाचे यश निश्चित करण्याऐवजी नागरिकांच्या प्रत्यक्ष अनुभवांचाही विचार होणे आवश्यक आहे. प्रशासनाने प्रकल्पाचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करून वाहतूक कोंडी, पार्किंग, पदपथांची रचना आणि पावसाळ्यातील समस्यांवर ठोस उपाययोजना कराव्यात. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर प्रकल्पाचे कौतुक होत असताना स्थानिक नागरिकांचा आवाजही ऐकला गेला पाहिजे, अशी मागणी डॉ. विजयकुमार पाटील यांनी केली आहे.

















