- तब्बल ४०० एकरांवर करणार चारा लागवड..
- प्रक्रिया केलेल्या पाण्यावर मका आणि चारा पिकवणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १८ नोव्हेंबर २०२६) :- राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आणि पशुधनासमोर निर्माण झालेल्या चारा टंचाईवर मात करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने पुढाकार घेतला आहे. पिंपरी येथील मिलिटरी डेअरी फार्मच्या सुमारे ४०० एकर पडीक जमिनीवर चारा लागवड करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. या उपक्रमातून उत्पादित होणारा चारा राज्यातील दुष्काळग्रस्त भागांतील पशुधनासाठी पाठविण्यात येणार आहे.
मुख्यमंत्र्यांनी दुष्काळग्रस्त शेतकरी आणि पशुधनाला मदत करण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत महापालिकेने हा उपक्रम हाती घेतला आहे. संरक्षण विभागाची मिलिटरी डेअरी फार्ममधील जमीन काही वर्षांपासून वापराविना पडून आहे. ही जमीन चारा लागवडीसाठी तात्पुरत्या स्वरूपात उपलब्ध करून देण्याची मागणी महापालिकेने संरक्षण विभागाकडे केली आहे. त्यासाठी आवश्यक ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) मिळण्याची प्रतीक्षा आहे.
परवानगी मिळाल्यानंतर जमिनीची मशागत करून मका आणि अन्य चारा पिकांची लागवड केली जाणार आहे. जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात पेरणी करण्याचे नियोजन असून, मार्च-एप्रिलपर्यंत चारा उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. या कामासाठी महापालिकेचे मनुष्यबळ आणि यंत्रणा वापरण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, चारा उत्पादनासाठी महापालिकेच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील (एसटीपी) प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे शहराच्या पिण्याच्या पाण्यावर अतिरिक्त भार न पडता पाण्याचा पुनर्वापर साध्य होणार आहे. उत्पादित चारा शासनाच्या मार्गदर्शनानुसार सर्वाधिक टंचाई असलेल्या दुष्काळी भागांमध्ये वितरित केला जाणार आहे.
दरम्यान, दुष्काळाच्या संकटात पशुधनाला चारा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका उपलब्ध जमीन, प्रक्रिया केलेले पाणी आणि प्रशासकीय यंत्रणेचा प्रभावी वापर करणार आहे. संरक्षण विभागाची परवानगी मिळताच लागवडीचे काम सुरू करण्यात येईल, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली.

















