- बनावट नियुक्तीपत्रे आणि महापालिकेच्या शिक्क्यांचा वापर; पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ नोहेंबर २०२६) :- पुणे महानगरपालिकेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत बेरोजगार तरुणांसह अनेकांची तब्बल १ कोटी २९ लाख ४४ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी अशोक काशिनाथ नायनी (वय ५८, रा. पिंपरी) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. विजेंद्र हनुमंत पवार (वय ३८, रा. घोरपडी, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने आपली पुणे महानगरपालिकेत ओळख असल्याचे सांगून बेरोजगारांना महापालिकेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी आरोपीने पुणे महानगरपालिकेच्या नावाने बनावट नियुक्तीपत्रे तयार केली. तसेच महापालिकेच्या शिक्क्यांचा वापर करून बनावट लेटरहेडवर नियुक्तीपत्रे दिली. या माध्यमातून फिर्यादी आणि इतर साक्षीदारांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून पैसे घेतले.
या प्रकारात फिर्यादी यांची १ लाख ३३ हजार ६०० रुपयांची, तर इतर साक्षीदारांची १ कोटी २८ लाख १० हजार ४०० रुपयांची अशी एकूण १ कोटी २९ लाख ४४ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.


















