- कुणाल आयकॉन रोडवर अँटिक पथदिव्यांचा प्रयोग!
- शत्रुघ्न काटे यांच्याकडून कामाची पाहणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २४ नोव्हेंबर २०२६) :- पिंपळे सौदागर येथील कुणाल आयकॉन रोडला आकर्षक प्रकाशसजावटीचा नवा साज मिळणार आहे. या मार्गावरील फुटपाथवर ‘पोस्ट टॉप डेकोरेटिव्ह फिटिंग’ आणि ‘बरीड लाईट्स’ या अँटिक पथदिव्यांची प्रायोगिक तत्त्वावर उभारणी करण्यात आली आहे. भाजप शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न (बापू) काटे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून कामाचा आढावा घेतला.
रात्रीच्या वेळी पादचाऱ्यांची सुरक्षितता वाढविण्यासह परिसराचे सौंदर्य खुलविण्याच्या उद्देशाने हा प्रयोग करण्यात आला आहे. दिव्यांची रचना, प्रकाशाचा परिणाम आणि तांत्रिक बाबींची तपासणी करण्यात येत आहे. प्रयोग यशस्वी झाल्यास संपूर्ण मार्गावर अशाच सुविधा विकसित करण्याचे नियोजन आहे.
यावेळी नगरसेविका अनिताताई काटे, कुंदाताई भिसे, जयनाथ काटे, विद्युत कार्यकारी अभियंता सचिन नांगरे, उपअभियंता दिपाली धेडे, कनिष्ठ अभियंता गिरीधर कोरे आणि कॉन्ट्रॅक्टर उपस्थित होते. या उपक्रमाचे उपस्थित लोकप्रतिनिधींनी स्वागत केले.

















