- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि शंकरभाऊ जगताप स्पोर्ट्स फाऊंडेशनचा संयुक्त उपक्रम…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २४ नोव्हेंबर २०२६) :- भारतीय संविधानाचा सन्मान, लोकशाही मूल्यांचे संवर्धन आणि युवा पिढीमध्ये संविधानाविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने पिंपरी-चिंचवड शहरात पहिल्यांदाच भव्य ‘संविधान सन्मान दौड-२०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि शंकरभाऊ जगताप स्पोर्ट्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे, अशी माहिती आमदार शंकर जगताप यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून शहरात अशा प्रकारची भव्य ‘संविधान सन्मान दौड’ आयोजित करण्याची संकल्पना आमदार शंकर जगताप यांनी मांडली होती. या उपक्रमाच्या माध्यमातून आता दरवर्षी ही भव्य दौड आयोजित करण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला आहे.
प्रस्तावित ‘संविधान सन्मान दौड-२०२६’ ही गुरुवार, दिनांक २६ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ७.०० वाजता क्रांतिगुरु वस्ताद लहुजी साळवे स्मारक चौक, चिंचवड येथून सुरू होणार आहे. साधारण दीड किलोमीटर अंतराची ही दौड भीमसृष्टी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पिंपरी येथे संविधान प्रास्ताविकेच्या सामूहिक वाचनाने समाप्त होईल. या दौडीत सहभागी होणाऱ्या प्रत्येक नागरिकाला आयोजकांच्या वतीने विशेष सहभाग प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात येणार आहे.
सर्वस्तरीय नागरिकांचा सहभाग..
या दौडीत नगरसेवक- नगरसेविका, महापालिका प्रशासन, पोलीस प्रशासन, उद्योजक, डॉक्टर, इंजिनिअर, वकील, पत्रकार, शिक्षक, शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी, विविध सामाजिक संस्था, युवक मंडळे, महिला बचत गट, क्रीडा संघटना आणि शहरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी आमदार महेश लांडगे, आमदार उमा खापरे, आमदार अमित गोरखे, महापौर रवि लांडगे, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे आणि महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे मोलाचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभत आहे.
सहभागाचे आवाहन..
ही केवळ धाव नसून संविधानाचा सन्मान, लोकशाहीवरील विश्वास आणि आपल्या नागरिक कर्तव्याची जाणीव आहे. संविधानाचा विचार मनात घेऊन एकतेच्या पावलांनी पुढे जाण्यासाठी शहरातील नागरिक, विद्यार्थी आणि युवकांनी दिलेल्या क्यूआर कोडद्वारे नोंदणी करून गुरुवार, २६ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ७ वाजता क्रांतिगुरु वस्ताद लहुजी साळवे स्मारक चौक, चिंचवड येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
“२६ नोव्हेंबर हा दिवस देशभरात भारतीय संविधान दिन म्हणून अत्यंत अभिमानाने साजरा केला जातो. संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधुता, सामाजिक न्याय, नागरिकांचे मूलभूत अधिकार आणि कर्तव्ये तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान निर्मितीतील अतुलनीय योगदान नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. ही दौड केवळ एक क्रीडा स्पर्धा न राहता राष्ट्रीय एकात्मतेची मूल्ये जनमानसात रुजवणारी एक लोकचळवळ ठरावी, हाच यामागील मुख्य उद्देश आहे. पिंपरी-चिंचवडकरांनी या ऐतिहासिक दौडीत मोठ्या संख्येने सहभागी होऊन संविधानाप्रती आपला आदर व्यक्त करावा.” – शंकर जगताप (आमदार, चिंचवड विधानसभा)…


















