- ऑलिम्पिक दर्जाच्या क्रीडा सुविधांचे नियोजन..
- बॅडमिंटन, टेनिस, पिकलबॉल कोर्टसह सिंथेटिक रनिंग ट्रॅक उभारणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २४ नोव्हेंबर २०२६) :- स्थानिक खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने शिवसेना गटनेते तथा नगरसेवक विश्वजित बारणे यांनी कै. मोरू बारणे क्रीडांगणाच्या आधुनिक विकासासाठी पुढाकार घेतला आहे. या अनुषंगाने महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांच्यासमवेत त्यांनी क्रीडांगणाची प्रत्यक्ष पाहणी केली.
या ठिकाणी ऑलिम्पिक दर्जाच्या सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने बॅडमिंटन, टेनिस, पिकलबॉल कोर्ट, सिंथेटिक रनिंग ट्रॅक आणि बहुउद्देशीय क्रीडा कोर्ट उभारण्याचे नियोजन आहे.
तसेच लक्ष्मणनगर येथील लक्ष्मीबाई बारणे उद्यानाची पाहणी करून नागरिकांसाठी अधिक दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणे, उद्यानाचे नूतनीकरण आणि आवश्यक सुधारणा करण्याबाबत चर्चा करण्यात आली. दोन्ही विकासकामांसाठी नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा झाली. यावेळी महापालिकेच्या उद्यान, विद्युत व स्थापत्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

















