- आम आदमी पार्टीची आयुक्तांकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २४ नोव्हेंबर २०२६) :- प्रभाग क्रमांक १९ च्या विद्यमान नगरसेविका सविता धनराज आसवानी यांनी महापालिकेची पूर्वपरवानगी न घेता तसेच मंजूर बांधकाम नकाशाचे उल्लंघन करून अनधिकृत बांधकाम केल्याचा आरोप आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र राज्य समन्वयक अमित म्हस्के यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू करावी आणि संबंधित बांधकामावर निष्कासनाची कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मौजे पिंपळे निलख, विशालनगर येथील सर्व्हे क्रमांकामधील शॉप क्रमांक १ येथे हे अनधिकृत बांधकाम झाल्याचा म्हस्के यांचा आरोप आहे. यासंदर्भात महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम विभागासह ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाने यापूर्वी नोटिसा बजावल्या आहेत. मात्र, अद्याप ठोस कारवाई झाली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ मधील कलम १० (१ड) चा आधार घेत संबंधित नगरसेविकेच्या अपात्रतेची प्रक्रिया सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच स्थळपाहणी, मोजमाप आणि पंचनामा करून बांधकामावर कारवाई करावी, अशी मागणी आहे. प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास महापालिकेसमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही अमित म्हस्के यांनी दिला आहे.

















