न्यूज पीसीएमसी नेटवर्क
आळंदी (दि. २५ नोहेंबर २०२६) :- वाहन बाजूला घेण्यास सांगितल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणाला गाडीतून बाहेर ओढून बेदम मारहाण केल्याची घटना आळंदी-मरकळ रोडवरील घुंडरे पेट्रोल पंपाजवळ घडली. या मारहाणीत तरुणाच्या डोक्याला दुखापत झाली असून त्याच्या कानातील सोन्याची बाळीही हरवली आहे. याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात तिघांसह दोन अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भगवान विनायक आंधळे (वय ३१) असे जखमी फिर्यादीचे नाव आहे. २३ नोव्हेंबर रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास ते मरकळ रोडवरील घुंडरे पेट्रोल पंपाजवळ वाहनात बसून प्रवासी मिळण्याची वाट पाहत होते.
त्यावेळी आरोपी विजय संजय लहाने (वय २०), करण दत्तात्रय ढगे (वय २३), मोन्या ऊर्फ जय बाबाजी ठुबे(वय २०) आणि त्यांच्यासोबत असलेल्या दोन अनोळखी व्यक्ती तेथे आल्या. त्यांनी फिर्यादीला गाडी बाजूला घेण्यास सांगितले. यावरून दोघांमध्ये वाद झाला. आरोपींनी रागाच्या भरात फिर्यादीला शिवीगाळ करत कॉलर पकडून गाडीतून बाहेर ओढले आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.
दरम्यान, आरोपींनी फिर्यादीला खाली पाडून मारहाण केली. तसेच लोखंडी बक्कल असलेल्या पट्ट्याने डोक्यावर वार करून जखमी केले. पुन्हा या परिसरात गाडी घेऊन दिसलास तर सोडणार नाही, अशी धमकीही दिली. या मारहाणीत फिर्यादीच्या कानातील सोन्याची बाळी कुठेतरी पडून हरवली.
या प्रकरणी २४ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजून ३३ मिनिटांनी आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास आळंदी पोलीस करीत आहेत.

















