- तीन एकरावरील २७२ झाडांना बाधा होण्याची शक्यता!
- वृक्षतोडीच्या प्रस्तावाला पर्यावरणप्रेमींचा विरोध…
मा. अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २६ नोव्हेंबर २०२६) :- पिंपरी-चिंचवड शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी महापालिकेने दुर्गा टेकडी परिसरात मोठ्या क्षमतेची भूमिगत जलसाठा टाकी उभारण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र, या प्रकल्पामुळे निगडी प्राधिकरणातील दुर्गा टेकडीवरील २७२ झाडे बाधित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शहराच्या पाणीप्रश्नावर उपाय शोधताना नैसर्गिक संपत्तीचा बळी दिला जाणार का, असा सवाल पर्यावरणप्रेमींकडून उपस्थित केला जात आहे.
महापालिकेच्या नियोजनानुसार शहरात प्रत्येकी १६ एमएल क्षमतेच्या दोन भूमिगत जलसाठा टाक्या उभारण्यात येणार आहेत. त्यापैकी एक सेक्टर २३ येथील जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या परिसरात, तर दुसरी दुर्गा टेकडीच्या माथ्याखालील ओपन जीम परिसरात प्रस्तावित आहे.
या योजनेअंतर्गत सेक्टर २३ येथून पंपिंगद्वारे बंदिस्त जलवाहिनीतून पाणी दुर्गा टेकडीवरील जलसाठा टाकीत आणले जाणार आहे. त्यानंतर गुरुत्वाकर्षणाच्या माध्यमातून शहरातील विविध भागांना पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे.
या प्रकल्पासाठी दुर्गा टेकडी परिसरातील सुमारे ४,५०० चौरस मीटर जागा जलसाठा टाकीसाठी आणि ७,५०० चौरस मीटर जागा जलवाहिनीसाठी आवश्यक आहे. अशा प्रकारे एकूण १२ हजार चौरस मीटर म्हणजेच जवळपास तीन एकर क्षेत्र या कामासाठी वापरले जाणार आहे.
दरम्यान, प्रस्तावित कामाच्या ठिकाणी येणाऱ्या २७२ झाडांबाबत महापालिकेच्या उद्यान विभागाकडून कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. संबंधित झाडांचे पुनर्रोपण किंवा आवश्यकतेनुसार ती हटविण्याबाबतचा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरणाच्या मंजुरीसाठी सादर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या झाडांवर महापालिकेकडून नोटिसाही लावण्यात आल्या आहेत.
१ डिसेंबरपूर्वी हरकती नोंदविण्याची संधी…
या प्रस्तावावर नागरिक, पर्यावरणप्रेमी आणि वृक्षप्रेमींना १ डिसेंबरपूर्वी आपले आक्षेप आणि सूचना नोंदविता येणार आहेत. त्यामुळे या मुदतीत किती हरकती दाखल होतात आणि वृक्ष प्राधिकरणाकडून काय निर्णय घेतला जातो, याकडे लक्ष लागले आहे.
शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीने पाणीपुरवठा व्यवस्था सक्षम करणे आवश्यक असले, तरी त्यासाठी दुर्गा टेकडीसारख्या नैसर्गिक हिरवाईने नटलेल्या परिसराचे नुकसान होऊ नये, अशी भूमिका पर्यावरणप्रेमींकडून मांडली जात आहे. पर्यायी जागा, पर्यायी मार्ग आणि झाडांचे जास्तीत जास्त संरक्षण यांचा विचार करूनच प्रकल्पाची अंमलबजावणी करावी, अशी मागणीही पुढे येत आहे.
विकासकामे आणि पर्यावरण संवर्धन यांचा समतोल राखण्याचे आव्हान आता महापालिकेसमोर उभे राहिले आहे. पाणीपुरवठ्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी दुर्गा टेकडीवरील २७२ झाडांचे भवितव्य काय ठरणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
“शहरातील नागरिकांना नियमित आणि पुरेशा दाबाने पाणी उपलब्ध व्हावे, तसेच विविध भागांमध्ये पाण्याचे समान वितरण सुनिश्चित व्हावे, या उद्देशाने जलसाठा टाक्यांची उभारणी प्रस्तावित आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यासही पाणी वितरणावर परिणाम होऊ नये, यासाठी गुरुत्वाकर्षणावर आधारित वितरण व्यवस्था विकसित करण्याचे नियोजन आहे.” – महेश बरिदे, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग…
“प्रस्तावित जलसाठा प्रकल्पामुळे बाधित होऊ शकणाऱ्या झाडांच्या संदर्भात नियमानुसार नोटिसा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या हरकती व सूचनांचा विचार करून वृक्ष प्राधिकरणाच्या नियमानुसार पुढील प्रक्रिया राबविण्यात येईल.” – महेश गारगोटे, मुख्य उद्यान अधीक्षक

















