- ठेकेदारांनी केलेल्या कामांची प्रत्यक्ष पडताळणी होणार..
- चौकशी अहवालानंतरच प्रस्तावावर अंतिम निर्णय घेणार – सभापती अभिषेक बारणे…
मा. अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २६ नोव्हेंबर २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ६० कोटी १८ लाख ६८ हजार ५३ रुपयांच्या कामांशी संबंधित अर्थसंकल्पीय तरतुदींच्या प्रस्तावावर स्थायी समितीने महत्त्वपूर्ण भूमिका घेतली आहे. संबंधित कामे प्रत्यक्षात पूर्ण झाली आहेत का, त्यांचा दर्जा समाधानकारक आहे का आणि त्याबाबत प्रशासनाचा चौकशी अहवाल काय सांगतो, याची खातरजमा झाल्यानंतरच प्रस्तावाला मंजुरी देण्याची भूमिका स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे यांनी घेतली आहे. त्यामुळे नागरिकांच्या कररूपी पैशांचा योग्य विनियोग आणि कामांच्या गुणवत्तेला प्राधान्य देण्याचा संदेश प्रशासनाला देण्यात आला आहे.
महापालिकेच्या सन २०२५-२६ च्या अर्थसंकल्पाला २४ मार्च २०२६ रोजी मंजुरी मिळाली होती. त्यानंतर नगरसेवकांच्या नावाने सादर झालेल्या १७ पैकी १४ उपसूचना बोगस असल्याचे चौकशीमध्ये निष्पन्न झाले. या उपसूचनांच्या आधारे मुख्य लेखा व वित्त विभागाकडून ६० कोटी १८ लाख ६८ हजार ५३ रुपयांची बिले ठेकेदारांना अदा करण्यात आली होती.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे यांनी तत्कालीन आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्याला सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आणि अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय चौकशी समिती नियुक्त करण्यात आली.
चौकशी समितीने १२ जून रोजी आपला अहवाल सादर केला. त्यामध्ये १४ उपसूचना बोगस असल्याचे स्पष्ट झाले. तसेच, या उपसूचनांच्या आधारे स्थायी समिती किंवा सर्वसाधारण सभेची मान्यता न घेता आर्थिक व्यवहार झाल्याचे समोर आले. पुढील कारवाईसाठी हा अहवाल राज्य शासनाच्या वित्त विभागाकडे पाठविण्यात आला आहे.
दरम्यान, संबंधित आर्थिक व्यवहारांच्या अनुषंगाने अर्थसंकल्पातील वाढ आणि घट करण्यास मान्यता देऊन महापालिका सभेकडे शिफारस करण्याचा प्रस्ताव १६ सप्टेंबरच्या स्थायी समिती सभेत तहकूब करण्यात आला होता. बुधवार, दि. २५ नोव्हेंबर रोजी हा प्रस्ताव पुन्हा सभेसमोर ठेवण्यात आला. मात्र, संबंधित कामांची प्रत्यक्ष स्थिती आणि गुणवत्तेची खातरजमा होणे आवश्यक असल्याने समितीने तो दप्तरी दाखल केला.
कामांच्या गुणवत्तेला प्राधान्य – अभिषेक बारणे
या निर्णयाबाबत स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे यांनी स्पष्ट केले की, संबंधित ठेकेदारांनी नेमकी कोणती कामे केली, ती पूर्ण झाली आहेत का आणि कामांचा दर्जा कसा आहे, याची माहिती मिळणे आवश्यक आहे. या संदर्भातील अहवाल प्रशासनाकडून अद्याप प्राप्त झालेला नाही. त्यामुळे अहवालाची प्रतीक्षा करूनच पुढील निर्णय घेतला जाईल. आवश्यक तपासणी पूर्ण झाल्यानंतर प्रस्तावाला मंजुरी देण्याबाबत विचार केला जाईल.
सर्वसाधारण सभेच्या निर्णयालाही महत्त्व
प्रस्ताव दप्तरी दाखल झाल्यामुळे तो सर्वसाधारण सभेसमोर जाण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या सर्वोच्च सभागृहात या विषयावर चर्चा होऊन निर्णय घेतला जाऊ शकतो. त्यामुळे संबंधित कामांची प्रत्यक्ष पडताळणी, चौकशी अहवाल आणि सभागृहाचा निर्णय या सर्व बाबी महत्त्वाच्या ठरणार आहेत.

















