न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे :- जुना बाजार येथे जे होर्डिंग उभारण्यता आले होते ते नियमानुसार बसविण्यात आले होते. ते अवैध नसल्याचा खुलासा रेल्वेच्या पुणे परिमंडळ विभागाचे प्रमुख मिलिंद देऊस्कर यांनी केला आहे.
मालधक्का येथे होर्डिंग कोसळले त्यासाठी रेल्वे प्रशासनाला जबाबदार धरण्यात येत आहे. यासंदर्भात माहिती देताना देऊस्कर यांनी ही घटना दुर्देवी असल्याचे म्हंटले आहे. होर्डिंग हटविताना हलगर्जीपणा झाल्यामुळेच ही घटना घडली आहे. त्याबाबतच उच्चस्तरीय समिती निष्पक्ष चौकशी करत आहे. त्याचबरोबर घोरपडी आणि जुना बाजार येथील होर्डिंग काढण्याच्या जबाबदारी ही वेगवेगळ्या ठेकदारांकडे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
तसेच, होर्डिंगबाबत महापालिकेने रेल्वे प्रशासनाला सन 2013 पासून पत्राद्वारे वेळोवळी सांगितल्याचा दावा केला होता. मात्र, होर्डिंग हटविण्यात कुठलीही दिरंगाई झाली नसल्याचेही देऊस्कर यांनी स्पष्ट केले आहे. रेल्वे प्रशासनाच्या वतीने स्वत: ही होर्डिंग काढून टाकण्यात येत होती. तीन होर्डिंग नीट काढण्यात आले. मात्र, शेवटचे होर्डिंग काढताना हलगर्जीपणा झाल्याची कबुली त्यांनी दिली.
दरम्यान, काल घडलेल्या घटनेची चौकशी करण्यासाठी मुंबई येथून रेल्वेची उच्चस्तरीय चौकशी समिती सकाळी पुण्यात आली असून या समितीमध्ये रेल्वेच्या वरिष्ठ स्तरावरील अभियंत्यांचा समावेश आहे.













